कळंब (प्रतिनिधी) : संतांचे जीवन समाजाच्या कल्याणासाठी समर्पित असते. संतांनी दिलेले विचार, संस्कार आणि तत्त्वज्ञान समाजाला योग्य दिशा देतात. काळ बदलला तरी संतांचे विचार चिरंतन राहणार आहेत, असे प्रतिपादन ह.भ.प. गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले यांनी केले.
डिकसळ येथे श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात सोमवारी (दि. २) गुलालाच्या कीर्तनसेवेत ते बोलत होते. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या सप्ताहाचा मुख्य पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. दुपारी दोन वाजता समाधीवर भाविकांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली.
संतांच्या ठायी दया, करुणा आणि निर्मळ अंतःकरण असते. त्यांच्या वाणीतील विचार समाजाला नैतिकतेची आणि सदाचाराची शिकवण देतात. साधुसंतांचे वैराग्य, त्याग आणि निःस्वार्थी जीवन समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे संतांचे विचार व संस्कार जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रकाश महाराज यांनी सांगितले.
आध्यात्मिक क्षेत्रातील अपप्रवृत्तींना पायबंद घाला!
सध्याच्या काळात आध्यात्मिक क्षेत्रात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. संतपरंपरेचे पावित्र्य आणि वारकरी संप्रदायाचे मूळ विचार जपण्यासाठी समाजाने सजग राहून अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मंदिराची आकर्षक पुष्पसजावट
पुण्यतिथी उत्सवानिमित्त संपूर्ण मंदिराची डिकसळ येथील हनुमंत अंबिरकर यांनी फुलांनी आकर्षक सजावट केली होती. भास्कर जाधव यांनी केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने उत्सवात विशेष रंगत आणली. या सोहळ्यास धाराशिव, बीड, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांतून हजारो भाविक उपस्थित होते.
उत्सवाच्या यशस्वितेसाठी संस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प. परमेश्वर महाराज बोधले, ह.भ.प. आण्णा महाराज बोधले, रामेश्वर महाराज बोधले, बाळासाहेब महाराज बोधले यांच्यासह डिकसळ येथील तरुण मंडळी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. अखंड हरिनाम, कीर्तनसेवा आणि भक्तिमय वातावरणात पुण्यतिथी उत्सव उत्साहात पार पडला.
