धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे राष्ट्रसेविका समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त पथसंचलन आणि या निमित्ताने विजयादशमीचे आणि विजयी पर्वाचे महत्त्व सांगणारे बौद्धिक संपन्न झाले.
यानिमित्ताने प्रमुख वक्त्या उज्वला मसलेकर यांनी समितीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल समिती स्थापनेपासून आजपर्यंतच्या समिती कार्याचा आढावा घेतला. प्रभाव से परिवर्तन तक समिति के 90 साल“ हा विषय मांडताना, समितीच्या आद्य संचालिका वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांनी केलेल्या कार्याचा व समितीच्या सेविकांनी केलेल्या योगदानाचा उल्लेख केला. राष्ट्रसेविका समिती समाजामध्ये राष्ट्रभक्ती, समाज जागरण,संस्कार,समर्पण,सेवा या पद्धतीने काम करत असते. त्यातून काय परिवर्तन होते हे आपल्या ओघवत्या भाषेत उदाहरणासहित सांगितले. पुढच्या काळात सेविका म्हणून आपल्याला अजूनही समाज जागरण आणि राष्ट्रासाठी परिवर्तन घडवायचे आहे.हे प्रतिपादित केले. प्रास्ताविक शर्मिष्ठा डांगे यांनी केले. कार्यक्रमात देशभक्तीपर वैयक्तिक गीत आणि सामूहिक पद्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी शहर कार्यवाहीका वैशाली जोशी यांनी उपस्थित सर्वाचे ऋण व्यक्त केले. उत्सवाच्या अध्यक्षस्थानी अनुराधा तोडकरी, जिल्हा कार्यवाहीका वर्षा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शस्त्र पूजन, देवी अष्टभुजा, लक्ष्मीबाई केळकर, सरस्वतीताई आपटे यांच्या प्रतिमांचे पूजन झाले आणि भगव्या ध्वजाचे रोहण करून, ध्वजाला प्रणाम, प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर पथसंचलनामध्ये घोष पथक, भगवा ध्वजा सहित शेकडो सेविकांनी संचालन केले.
