धाराशिव (प्रतिनिधी)- दुष्काळी धाराशिवला पश्चिम महाराष्ट्रातील हक्काचे पाणी मिळावे, हे स्वप्न माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी पाहिले. त्यासाठी नियोजनबद्ध कृती व टोकाचा संघर्ष केला. अनेकांनी त्यांना साथ दिली. आपणही हा विषय सातत्याने लावून धरला. सलग पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमूल्य सहकार्याने अनेक वर्ष रखडलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. कृष्णेचे पाणी जिल्ह्यात आणण्याच्या कामाचा टप्पा पूर्ण झाला आहे. घाटणे बॅरेजपासून रामदरा तलावापर्यंतच्या पाचही टप्प्यांतील सर्व कामे 100 टक्के पूर्ण झाली आहेत. त्यामुळे तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यांसह धाराशिवच्या दुष्काळी भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
धाराशिव जिल्ह्यासाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या कृष्णा-मराठवाडा प्रकल्पांतर्गत योजना क्रमांक दोनमधून घाटणे बॅरेज येथील पाणी टप्प्याटप्प्याने उचलून रामदरा तलावापर्यंत आणले जाणार आहे. यासाठी घाटणे, पडसाळी, सावरगाव, पांगदरवाडी आणि सिंदफळ या ठिकाणांहून पाणी पुढे उचलण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पाचही टप्प्यांतील सर्व कामे आता 100 टक्के पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे पाणी उंच भागात पोहोचविण्यासाठी तयार केलेली उपसा यंत्रणा. घाटणे ते रामदरा या मार्गावर पाच टप्प्यांत पाणी उचलले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 44.17 मीटर, दुसऱ्या टप्प्यात 35.02 मीटर, तिसऱ्या टप्प्यात 27.16 मीटर, चौथ्या टप्प्यात 23.50 मीटर आणि पाचव्या टप्प्यात 61.52 मीटर उंचीवर पाणी उचलले जाणार आहे. हे अंतर साधारणपणे 62 मजली इमारतीइतके उंच आहे. त्यासाठी घाटणे, पडसाळी, सावरगाव, पांगदरवाडी, सिंदफळ आणि रामदरा या ठिकाणी एकूण सहा पंपगृहांची उभारणी करण्यात आली आहे. त्यासाठी एकत्रित 3 लाख 22 हजार 996 अश्वशक्ती क्षमतेच्या पंपांचे काम पूर्ण झाले आहे. पंपगृहांची उभारणी, पंप-मोटार बसविणे, विद्युत पुरवठा, सबस्टेशन, ट्रान्समिशन लाइन, नियंत्रण यंत्रणा आणि जलवाहिन्यांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राजकीय विरोध सहन केला
कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी तत्कालीन पाटबंधारे मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांना राजकीय विरोध सहन करावा लागला. मुख्यमंत्री पदासाठी आलेली संधी या राजकीय विरोधामुळेच गेली होती. त्याचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही या योजने संदर्भात मनावर घेवून पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला आर्थिक पाठबळ दिल्यामुळे या योजनेतील पाचही टप्पे पूर्ण झाले आहेत. धाराशिव जिल्हा अकांक्षित व दुष्काळी जिल्हा असल्यामुळे 1 टीएमसी पाणी पिण्यासाठी देण्यास मुख्यमंत्री यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना आदेश दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
आता या सगळ्या यंत्रणेच्या चाचण्या, तांत्रिक तपासणी आणि प्रत्यक्ष पाणीप्रवाह सुरू करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याच्या दुष्काळी भागात आणण्याचे स्वप्न माजी मंत्री आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी पाहिले. त्यासाठी प्रसंगी मोठी राजकीय किंमतही चुकवली. डॉक्टर यांंचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. त्यामुळेच आज प्रत्यक्षात जिल्ह्यात पाणी दाखल होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर धाराशिवच्या शेतीला आणि गावागावांतील पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळणार आहे. अनेक वर्षांपासून असलेली पाण्याची प्रतीक्षा कायमची संपणार आहे. दुष्काळाशी कायमचा संघर्ष करणाऱ्या धाराशिव जिल्ह्याला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प निर्णायक ठरणारा असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. आपल्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अनियमित आहे, वारंवार त्यात पडणारा खंड आणि घटती भूजलपातळी यामुळे शेतकरी बांधवांना दरवर्षी आवर्षणाच्या संकटाचा सामना करावा लागतो. अनेक गावांवर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ येते. अशा परिस्थितीत कृष्णा-मराठवाडा प्रकल्प जिल्ह्याला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. रामदरा तलावासह नियोजित जलसाठ्यांमध्ये पाणी उपलब्ध झाल्यानंतर परिसरातील शेतीला सिंचनाचा आधार मिळेल. भूजलपातळी वाढण्यास मदत होईल. विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची उपलब्धता सुधारण्यास हातभार लागेल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. शेतीला पाणी मिळाल्यास पीक उत्पादनात स्थिरता येईल. शेतकरी बांधवांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच प्रकल्प पूर्णत्वास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे प्रकल्प आज पूर्णत्वास गेला आहे. कृष्णा-मराठवाडा प्रकल्पासाठी मोठ्या निधीची आणि अत्याधुनिक यंत्रणेची आवश्यकता होती. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला प्राधान्य दिले. त्यांच्या अनमोल सहकार्यामुळे 11 हजार 726 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर आवश्यक निविदा प्रक्रिया आणि निधी उपलब्धतेमुळे कामांना गती आली. आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि राज्य सरकारच्या भक्कम पाठबळामुळेच आज हा प्रकल्प पूर्ण झाला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
उजनीतील एक टीएमसी पाणी लवकरच
जिल्ह्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उजनी जलाशयातून पिण्यासाठी एक टीएमसी पाणी धाराशिव जिल्ह्याला उपलब्ध करून देण्याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यांनी या अनुषंगाने खास बाब म्हणून त्याला परवानगी दिली आहे. याबाबत प्रशासकीय कार्यवाही चालू आहे. घाटणे ते रामदरा या पाचही टप्प्यांचे काम पूर्ण झाल्यामुळे उजनीतून येणाऱ्या पाण्याची चाचणी आता सहज शक्य झाली आहे.त्यानंतर दुष्काळाची वाढती तीव्रता लक्षात घेत गरजेनुसार उजनी जलाशयातून जिल्ह्यासाठी निर्धारित करण्यात आलेले अतिरिक्त एक टीएमसी पाणी घेतले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
