अतनुर (प्रतिनिधी)- आजच्या आधुनिक युगात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा ऱ्हास होत असताना, लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी डोंगराळ डोंगरी भागातील अतनूर येथील एका शाळकरी विद्यार्थ्याने पर्यावरण संवर्धनाचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ समाजासमोर घालून दिला आहे. येथील उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव पाटील यांची नात व अतनूरचे नवतरुण युवा सरपंच चंद्रशेखर अशोकराव पाटील यांची कन्या येथील स्थानिक शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या चि. सह्याद्री चंद्रशेखर पाटील याने सह्याद्री पर्वतरांगांमधील वाढती वृक्षतोड थांबवण्यासाठी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून साद घातली आहे. त्याच्या या धाडसी आणि संवेदनशील पावलाचे सध्या संपूर्ण राज्यभरातून मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
पत्रातून मांडली सह्याद्रीची व्यथा!
सह्याद्री पर्वतरांगा हा महाराष्ट्राचा अमूल्य नैसर्गिक वारसा असून, तेथील जैवविविधता धोक्यात आली आहे याकडे चि. सह्याद्री याने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. “झाडे वाचवा, जैवविविधता जपा, सह्याद्री वाचवा आणि आपले भविष्य सुरक्षित करा!“ असा कळकळीचा संदेश त्याने आपल्या पत्रातून दिला आहे. एका लहान विद्यार्थ्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील संकटांची जाणीव ठेवून घेतलेली ही भूमिका अत्यंत कौतुकास्पद ठरली आहे.
छत्रपतींच्या महाराष्ट्रात एक नवी प्रेरणा...
इतिहास साक्ष आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण केले. त्याच महाराष्ट्रात आज एका विद्यार्थ्याने सह्याद्रीच्या रक्षणासाठी आवाज उठवून आपल्यातील सामाजिक जाणीव आणि प्रगल्भता दाखवून दिली आहे. सह्याद्री पाटील याच्या या धाडसामुळे समाजातील इतर घटकांना, विशेषतः तरुण पिढीला आणि विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनासाठी काम करण्याची एक नवी प्रेरणा मिळाली आहे.
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव!...
चि. सह्याद्री पाटील याच्या या जनजागृतीच्या प्रयत्नांची दखल घेऊन पर्यावरणप्रेमी, शिक्षक आणि सामाजिक संस्थांकडून त्याचे जाहीर अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही त्याने अशाच प्रकारे समाजहितासाठी आणि निसर्गसंवर्धनासाठी आपले कार्य अखंड सुरू ठेवावे, अशा सदिच्छा त्याला दिल्या जात आहेत. लहान वयात निसर्गाविषयी एवढी मोठी संवेदनशीलता दाखवणारा सह्याद्री खऱ्या अर्थाने समाजासाठी मार्गदर्शक ठरला आहे.

