परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील कार्ला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक शिवशाहीर शरद बबनराव नवले यांची ‌‘आयडॉल शिक्षक' म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल शरद नवले यांचा परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते फेटा बांधून, शाल व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. 

शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत ही निवड करण्यात आली आहे. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद रगडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, पंचायत समिती सदस्य केदार पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सारंग घोगरे, जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील, तुषार कोळेकर, सेवानिवृत्त मेजर नितीन नवले आदी उपस्थित होते. 

शासनाच्या या योजनेचा उद्देश म्हणजे ‌‘आयडॉल शिक्षक' हे केवळ पुरस्कारप्राप्त शिक्षक नसून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्ता वाढीसाठी करून घेणे. तसेच या उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव इतर शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याकरिता ही संकल्पना राबविण्यात येत असून, शरद नवले हे इतर शिक्षकांना अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनर म्हणून काम करणार आहेत. याप्रसंगी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी शरद नवले यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन करून त्यांच्या कडून शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी आणि नवतंत्रज्ञाना बरोबरच संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे आदर्शवत कार्य घडावे, यासाठी शुभेच्छा दिल्या. 

 
Top