तेर (प्रतिनिधी)-  पंढरपूर येथील कार्तिक सोहळ्यासाठी वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या तालावर हरीनामाचा जयघोष करत मार्गस्थ झालेल्या श्री संत गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे ढोराळे ता. बार्शी येथे आजोळी बाळोजीबाबा महाराज भजनी मंडळासह ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजीसह फुलांची उधळण करत भव्यदिव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी ढोराळे गावासह परिसरातील गावातील भाविक भक्तांसह वारकऱ्यांच्या गर्दीने अवघे ढोराळे गाव फुलून गेल्याने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले .विशेष म्हणजे भोगावती नदीकाठी संत गोरोबा काका व संत बाळोजीबाबा या दोन संतांच्या भेटीने अवघा भोगावती नदीचा काठ भाविक भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेर ता. धाराशिव येथील वारकरी संप्रदायातील थोर संत संतशिरोमणी श्री संत गोरोबा काकांचा पायी पालखी सोहळा प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासक राजेंद्र कानाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊबीजेच्या दिवशी पंढरपूर येथील कार्तिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी टाळ मृदंग व हरीनामाचा जयघोष करीत गेली आहे.  शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. 

गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे हिंगळजवाडी, वरुडा, धाराशिव, वैराग येथील मुक्काम करत चार दिवसांच्या पायी प्रवासानंतर मजल दर मजल करत बार्शी तालुक्यातील ढोराळे येथील गोरोबा काकांच्या आजोळात दुपारच्या सुमारास आगमन होताच ढोराळे येथील श्री संत बाळोजीबाबा महाराज भजनी मंडळासह ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे जल्लोषात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. श्री संत गोरोबा काका व संत बाळोजीबाबा यांच्या भेटीने भोगावती नदीचा काठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याने सर्वत्र भक्तीमय वातावरणात निर्माण झाले होते. 

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top