भूम (प्रतिनिधी)- श्री माढेकर स्वामी मठ संस्थान, माढा येथून श्री क्षेत्र कपिलधारकडे निघालेल्या पायी दिंडी सोहळ्याचे भूम शहरात लिंगायत समाज बांधवांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी श्री ष. ब्र. 108 श्री गुरु प्रभूदेव शिवाचार्य माढेकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
18 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथून या पायी दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. ही दिंडी 23 नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र कपिलधार येथे पोहोचणार आहे. भूम शहरात आगमन झाल्यानंतर दिंडीची नगरपरिषद मेन रोड मार्गे मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक दत्त मंदिर येथे पोहोचल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली. यानंतर दत्त मंदिरात श्री गुरु प्रभूदेव शिवाचार्य माढेकर महाराज यांचे आशीर्वचन झाले. उपस्थित भाविकांनी महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दिंडीतील वारकऱ्यांना चहा व नाश्ता देऊन पुढील प्रवासासाठी पालखी सोहळ्याला निरोप देण्यात आला. या स्वागत सोहळ्यास अशोक तोडकर, सिद्धेश्वर मनगिरे, ओम स्वामी, विजय सोलापूरे, बाजीराव बळे, मधुकर शेटे, धनंजय शेटे, अतुल स्वामी, उमेश मनगिरे, श्रीकांत नकाते यांच्यासह लिंगायत समाज बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
