धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून उमरगा, लोहारा आणि तुळजापूर यासोबतच शेजारील लातूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी शेती विकास, जलसंवर्धन, महिला सक्षमीकरण आणि पूरक शिक्षणासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामोद्धाराचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम सुरू आहे.
या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने नुकत्याच काढण्यात आलेल्या पत्रकार अभ्यास दौऱ्यानिमित्त ज्ञानप्रबोधिनीच्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यात आली. सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून लोक सहभागातून लोकांच्या श्रमदानातून 15हजार लिटरच्या 27 पाण्याच्या टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत, त्यामुळे गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था झाली आहे. या टाक्या लोकसभागातून आणि श्रमदानातून बांधलेल्या असल्यामुळे या टाक्यांची काळजी ग्रामस्थ घेत आहेत. यासोबतच ज्ञानप्रबोधिनी च्या माध्यमातून लोहारा तालुक्यातील दीडशे विहिरीतील गाळ काढून खोलीकरण लोक सहभागातून करण्यात आले आहे. त्यामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थितीतही या विहिरींना शाश्वत पाणी व्यवस्था झाली आहे. लोहारा तालुक्यातील पाच गावात साडेतीन हजार पेक्षा जास्त जलतारा खड्डे घेतल्यामुळे वाडी वडगाव या लोहारा तालुक्यातील गावात आणि परिसरातील अनेक गावात पाणीसाठा उंचावण्यास,भूजल पातळी कायम राहण्यास मदत होत आहे.
ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून पूरक शिक्षण विभाग चालवला जातो. या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विकासिका, आनंद शाळा,आनंदी शिक्षण,पढाई से दोस्ती, छोटे सायंटिस्ट, फिरती विज्ञान प्रयोगशाळा यामधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळत आहे. ज्ञानाप्रबोधिनीच्या माध्यमातून वड्या वस्त्यावर 119 ठिकाणी 6,975 विद्यार्थ्यांना या माध्यमातून विविध शैक्षणिक कौशल्य दिली जात आहेत. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षण शिक्षणाच्या प्रवाहात कायम टिकवणे,अभ्यासाची गोडी लावणे यासह आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून कृतीयुक्त शिक्षण देण्यावर ज्ञान प्रबोधिनीचा भर आहे.
यासोबतच लोहारा तालुक्यातील आणि संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती हा व्यवसाय कमीत कमी परवडणाऱ्या दरात करता यावा, यासाठी शेती अवजारे बँक चालवली जात असून त्या माध्यमातून शेतीतील विविध मशागतीची कामे करण्याची स्वयंचलित आणि माणसांच्या सहाय्याने चालवली जाणारी विविध यंत्रे आणि अवजारे यांची कमीत कमी दरात शेतकऱ्यांना उपलब्धता करून देण्यात येत आहे. सेंद्रिय शेती ला प्रोत्साहन देण्यासाठी ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून विविध सेंद्रिय औषधे तयार करण्याचे काम देखील ज्ञानप्रबोधिनीच्या कृषी विभागाच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
या पत्रकार अभ्यास दौऱ्यात वाडी वडगाव या गावात ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून गावातील नागरिकांना एकत्र करून सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे छोटे स्वयंरोजगार सुरू व्हावे आणि पाण्याचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने या पत्रकार अभ्यास दौऱ्यात एक छोटेखानी कार्यक्रम देखील घेण्यात आला.


