येरमाळा (प्रतिनिधी)- पंढरपूरची वारी म्हणजे भक्ती,श्रद्धा आणि सेवाभावाचा अनोखा संगम ,विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेत तत्परता दाखवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यातून वेगळा आदर्श निर्माण केला. कार्तिकी एकादशीनिमित्त गुरुवारी (ता. 19) पंढरपुरातील 65 एकर मैदानावर दिंड्यांच्या निवास व्यवस्थेची पाहणी करताना त्यांनी वारकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पानगाव शिवाजी बेडके वारकऱ्याने निवासाच्या ठिकाणी असलेल्या मातीच्या ढेकळांमुळे बसणे आणि झोपणे कठीण होत असल्याची समस्या मांडली. त्याची तत्काळ दखल घेत अवघ्या तीन तासांत मैदानावर मंडपातील जमीन लहान रोलरने चोपून दहा हजारांहून अधिक मॅट अंथरण्याची व्यवस्था करण्यात आली.
हभप भगवान बाबा महाराज येडशीकर यांच्या फडाला भेट दिल्यानंतर शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पानगाव (ता. कळंब) येथील वारकरी शिवाजी सुभाष बेडके आणि दिंडीचालक बंकट बेद्रे महाराज यांनी वारकऱ्यांच्या अडचणी व निवास व्यवस्थेबाबत आपले म्हणणे मांडले. बाथरूमसह निवासाच्या अन्य सुविधांबाबतही शिंदे यांनी चर्चा करून आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
एकनाथ शिंदे आणि पंढरपूरची वारी यांचे नाते सेवाभावाचे आहे. ते मुख्यमंत्री झाल्यापासून आषाढी आणि कार्तिकी वारीत वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. वारकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याची त्यांची भूमिका कौतुकास्पद आहे. पांडुरंगाच्या भक्तांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा, याचा प्रत्यय त्यांच्या कृतीतून येतो.
बंकट बेद्रे महाराज, प्रमुख, हभप भगवान बाबा येडशीकर फड .
