तेर (प्रतिनिधी)- बायफ संस्थेमार्फत पशुधन विकास, जलसुरक्षा व चारा सुरक्षेसाठी 100 गावांमध्ये ग्रामस्तरीय गटचर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती बायफचे विभागीय प्रमुख डॉ अतुल मुळे यांनी दिली.
ग्रामीण भागातील पशुपालकांच्या समस्या जाणून घेऊन गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी व शाश्वत उपाययोजना राबविण्याच्या उद्देशाने बायफ संस्थेमार्फत धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध गावांमध्ये ग्रामस्तरीय गटचर्चा आयोजित करण्यात येत आहेत. समृद्ध मराठवाड्याच्या दृष्टीने पाणी सुरक्षा, चारा सुरक्षा, पशुधन विकास आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी या उपक्रमांतर्गत जवळपास 100 गावांचे सर्वेक्षण व माहिती संकलन करण्यात येत आहे. या गटचर्चांचा मुख्य उद्देश गावातील पशुधनाची सद्यस्थिती, पशुपालकांच्या अडचणी, पाणीटंचाई, चारा उपलब्धता, पशुआरोग्य, पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धव्यवसायातील समस्या जाणून घेणे हा आहे.
मराठवाड्यातील जवळपास 100 गावांमध्ये करण्यात येणाऱ्या सर्वेक्षण व ग्रामस्तरीय गटचर्चांमधून प्राप्त होणाऱ्या माहितीचे संकलन, विश्लेषण आणि पुढील नियोजन करण्यासाठी दिनांक 27 नोव्हेंबर 2026 रोजी धाराशिव येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये गावनिहाय परिस्थिती, पाणी व चारा उपलब्धता, पशुधनाची सद्यस्थिती, पशुपालकांच्या समस्या आणि आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
