उमरगा (प्रतिनिधी)- आधुनिक भारताचे शिल्पकार आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून भारत शिक्षण संस्था संचलित भारत विद्यालय, उमरगा येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे आबा यांच्या पुतळ्याचे पूजन भारत प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर दासीने यांनी केले, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याचा व देशाच्या जडणघडणीत त्यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा घेण्यात आला. आधुनिक भारताच्या उभारणीसाठी त्यांनी केलेले कार्य, शिक्षणाविषयीची त्यांची दूरदृष्टी तसेच बालकांवरील त्यांचे विशेष प्रेम यांचे स्मरण करून त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास भारत विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
