तुळजापूर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि शेतीला कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत निर्माण व्हावा, या उद्देशाने रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर होणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींची कामे सध्या नव्या नियमांच्या कचाट्यात अडकली आहेत. जी-रामजी (G-RAM-G) कायदा २०२५ अंतर्गत विहिरींच्या कामावर मजुरांची सकाळी आणि संध्याकाळी फेस हजेरी (Face Attendance) बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून, अनेक ठिकाणी विहिरींची कामे ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही जाचक अट तातडीने रद्द करून पूर्वीप्रमाणे सुलभ पद्धतीने विहिरींची कामे करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे.

यासंदर्भात रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यात येणार आहेत. सिंचन विहीर ही शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. मात्र, या योजनेतील कामांसाठी मजुरांची दिवसातून दोन वेळा फेस हजेरी घेण्याची सक्ती केल्याने प्रत्यक्ष काम करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

ग्रामीण भागातील शेतशिवारात अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसते. इंटरनेटची समस्या, मोबाईलमधील तांत्रिक अडचणी आणि मजुरांची वेळेवर उपस्थिती यामुळे ऑनलाइन हजेरी नोंदविताना अडथळे येतात. प्रत्यक्ष मजूर कामावर उपस्थित असतानाही तांत्रिक कारणांमुळे त्यांची हजेरी नोंदविली जात नसल्याची अडचण शेतकऱ्यांना भेडसावत आहे. परिणामी, मजुरांचे नियोजन बिघडत असून विहिरींच्या कामाचा वेग मंदावला आहे.

एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळ, अनियमित पाऊस, पिकांचे नुकसान आणि वाढत्या शेती खर्चामुळे आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत सिंचन विहिरींच्या माध्यमातून शेतीला पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा असताना नव्या अटींमुळे ही कामेच रखडत असतील, तर शेतकऱ्यांनी जायचे कुणाकडे, असा सवाल उपस्थित होत आहे.

विहिरीचे खोदकाम, दगड फोडणे, माती उपसणे आणि बांधकाम अशा विविध स्वरूपाची कामे करताना मजुरांची उपस्थिती व कामाचे नियोजन परिस्थितीनुसार करावे लागते. मात्र, सकाळ-संध्याकाळ फेस हजेरीच्या बंधनामुळे शेतकऱ्यांना वारंवार तांत्रिक प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांना मदत मिळण्याऐवजी नियमांच्या अटींमुळे त्यांचीच अडवणूक होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


पाच प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधणार

वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींसाठी सकाळ-संध्याकाळ फेस हजेरीची सक्ती रद्द करावी, पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना आपल्या सोयीनुसार मजूर ठेवून काम करण्याची मुभा द्यावी, नेटवर्क व तांत्रिक अडचणींसाठी पर्यायी हजेरी व्यवस्था उपलब्ध करावी, सिंचन विहिरींची कामे विनाअडथळा पूर्ण होण्यासाठी स्वतंत्र सुलभ शासन निर्णय काढावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाचक नियमांतून दिलासा द्यावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात येणार आहेत.


शेतकऱ्यांना विहिरी द्यायच्या की नियमांच्या कचाट्यात अडकवायचे?

शासनाच्या रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा निर्माण करून देणे हा आहे. मात्र, फेस हजेरीच्या सक्तीमुळे विहिरींची कामेच ठप्प होत असतील, तर या योजनेच्या अंमलबजावणीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. तांत्रिक नियमांपेक्षा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणींना प्राधान्य देऊन फेस हजेरीची सक्ती रद्द करावी आणि सिंचन विहिरींची कामे पूर्वीप्रमाणे सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी त्रस्त शेतकरी करीत आहेत.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top