धाराशिव (प्रतिनिधी)- भगवान बिरसा मुंडा यांचे क्रांतिकारी विचार, त्यांचे कार्य आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे धाराशिव शहरातील एका चौकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्यासाठी नगर परिषदेने आगामी सर्वसाधारण सभेत ठराव घ्यावा. तसेच शहरात भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी सर्वांनी वैयक्तिक स्तरावर आर्थिक योगदान द्यावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार पाटील बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, नगराध्यक्ष नेहा काकडे, आदिवासी पारधी महासंघाचे सुनील काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, महिला व बालविकास सभापती वैशाली सोनवणे, नगरसेविका वंदना पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुला-मुलींना नियमितपणे शाळेत पाठवावे. विशेषतः कुटुंबातील माता शिक्षित असेल, तर संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर होतो. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीने प्रगतीची शिखरे गाठावीत. पारधी समाजातील बांधवांना उद्योग-व्यवसाय सुरू करताना अडचणी येत असतील, तर शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. यावेळी सुनील काळे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर चिमुकल्या बालकांपासून युवक-युवती, महिला आणि पुरुषांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषेत विविध नृत्ये व लेझीम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
