तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील लातूर रस्त्यावरील धारिवाल सोसायटी परिसरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील पावणेदोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना घडली. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सदरील घटनेचे सीसी टीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लातूर रस्त्यावरील धारिवाल सोसायटी येथे समृद्धी कंपनीचे मॅनेजर किशोर भोसले हे वास्तव्यास आहेत. त्यांची पत्नी पूर्वजा भोसले या घराबाहेर आल्या होत्या. त्याचवेळी शाळेतून मुलगी घरी आल्याने त्या मुलीला घेऊन घराकडे जात होत्या. दरम्यान, बुलेट दुचाकीवरून दोघेजण तेथे आले. त्यापैकी एकाने तोंडाला कापड बांधलेले होते. त्यांनी पूर्वजा भोसले यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. त्यांनी पत्ता माहीत नसल्याचे सांगताच अचानक त्यांच्या गळ्यातील पावणेदोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून घेतले.. आणि क्षणात दुचाकीवरून घटनास्थळावरून पलायन केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संबंधित महिला घाबरून गेल्या.
विशेष म्हणजे, शहरात चोऱ्या व गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सीसीटीव्ही यंत्रणा नुकतीच उभारण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही भरदिवसा वस्तीमध्ये सोनसाखळी हिसकावण्यासारख्या घटना घडत असल्याने या यंत्रणेचा प्रत्यक्षात कितपत उपयोग होत आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे धारिवाल सोसायटीसह लातूर रस्ता परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
