तुळजापूर (प्रतिनिधी)- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, विधवा, एकल महिला आणि वंचित घटकातील जनतेच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हॅलो मेडिकल फाऊंडेशन, अणदूर या संस्थेच्या वतीने जवळपास एकोणीस मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी धाराशिव, यांचेमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.

हे निवेदन जिल्हाधिकारी, धाराशिव, तहसिलदार, तुळजापूर, तहसिलदार, लोहारा आणि तहसिलदार, धाराशिव यांच्याकडे देण्यात आले. दुष्काळग्रस्त भागातील जनतेच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतमजुरांच्या हाताला काम नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न, तसेच विधवा आणि एकल महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत, रोजगार, पाणीपुरवठा, चारा छावण्या आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. क्रांती रायमाने, प्रकल्प समन्वयक बसवराज नरे, वासंती मुळे, जावेद शेख, नागिनी सुरवसे, मेधा काळे यांच्यासह संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. दुष्काळग्रस्त जनतेच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा पुढील काळात आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही यावेळी संस्थेच्या वतीने देण्यात आला. ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी हॅलो मेडिकल19 फाऊंडेशनने उचललेले हे पाऊल सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

 
Top