कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण, स्वावलंबन, सुरक्षा, सन्मान, समृद्धीसेवा आणि समरसता या मूलतत्त्वांवर कार्यरत अखिल भारतीय विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद (रजि.) यांच्या वतीने मुंबई येथे एकदिवसीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले. या अभ्यासवर्गात महाराष्ट्रातील भटके-विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. समाजाच्या न्याय्य हक्कांसह मूलभूत सुविधांसाठी संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

रविवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी बोरिवली (पूर्व), मुंबई येथील स्व. शैलजा गिरकर समरसता सभागृह, राजर्षी शाहू महाराज संस्कार केंद्र येथे हा अभ्यासवर्ग पार पडला. कर्मवीर पद्मश्री भिकूजी (दादा) रामजी इदाते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय कार्यवाह अनिल फड यांच्या उपस्थितीत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. परिषद महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी, विभागीय व जिल्हा पदाधिकारी तसेच भटके-विमुक्तांच्या न्याय आणि हक्कांसाठी कार्यरत विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.

अभ्यासवर्गात तीन सत्रांमध्ये भटके-विमुक्त समाजाची सद्यस्थिती, प्रमुख समस्या, केंद्र व राज्य सरकारची भूमिका, विविध आयोगांच्या शिफारशी आणि त्यांची सद्यस्थिती, शासनाच्या विविध योजना व निर्णय तसेच त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. याशिवाय, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर चर्चा करून ते मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि पुढील कार्यदिशेवर विचारविनिमय करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रीकुमार शिंदे, प्रदेशकार्यवाह गिरीधर साळुंके, डॉ. दिलीप गरूड, संतोष भांडे, सौ. निहारिका, दीपक जाधव यांच्यासह राज्यभरातून आलेले शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भटके-विमुक्त समाजाला न्याय, हक्क आणि मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रभावी संघटनात्मक कार्य, शासनस्तरावर पाठपुरावा आणि जनजागृती आवश्यक असल्याचे या अभ्यासवर्गातून अधोरेखित झाले. विचारमंथनातून पुढील नियोजन व कार्याची दिशा निश्चित करण्यात आली. पसायदानाने या मार्गदर्शनपर अभ्यासवर्गाची सांगता झाली.

 
Top