धाराशिव (प्रतिनिधी)- स्वाभिमानी मजदूर संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी पाठिंबा जाहीर केला. तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले.
गेल्या दीड वर्षापासून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा व तुळजापूर तालुक्यातील मजुरांनी रोजगार हमी कायदा तसेच विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन (VBG-RAM-G) अंतर्गत कामाची मागणी करूनही अद्याप काम उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा संघटनेने उपस्थित केला. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मजूर कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
या मोर्चाद्वारे दुष्काळग्रस्त मजूर कुटुंबांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, रोजगाराची मागणी केलेल्या मजुरांना तातडीने काम उपलब्ध करून द्यावे, काम न मिळालेल्या पात्र मजुरांना बेरोजगार भत्ता द्यावा, गरजू मजुरांचे जॉब कार्ड व ई-केवायसी प्रक्रिया मोफत आणि तातडीने पूर्ण करावी, महिला मजुरांसाठी योग्य काम उपलब्ध करून द्यावे, रोजगार हमी योजनेतील ई-केवायसी व फेस अटेंडन्ससह सर्व तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर सार्वजनिक कामांचे सेल्फ तयार करण्याची प्रक्रिया जलद करावी, तसेच रोजगार हमीची मजुरी प्रतिदिन 600 रुपये करून दर आठवड्याला मजुरांच्या खात्यावर वेतन जमा करावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
या मागण्यांसंदर्भात संघटनेने यापूर्वी 21 ऑक्टोबर 2026 रोजी प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र, अद्याप मागण्यांची पूर्तता न झाल्याने संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनाला पाठिंबा देताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी मजुरांच्या प्रश्नांवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या न्याय्य मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, अशी भूमिका मांडली. तसेच मजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. मजुरांच्या प्रश्नांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी स्वाभिमानी मजदूर संघटनेला अधिकृत पाठिंब्याचे पत्रही सुपूर्द केले.
