तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या सुरतगाव येथे हायवे लगत व गावात अवैध दारू विक्री आणि गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांतून होत आहे. या अवैध धंद्यांमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त केली जात असून, संबंधित पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तुळजापूर-सोलापूर महामार्गालगत वसलेल्या सुरतगावची लोकसंख्या सुमारे दोन हजारांच्या आसपास आहे. या गावात महामार्गालगत तसेच गाव परिसरात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. याशिवाय गुटख्याचीही मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
अवैध दारू विक्रीच्या वाढत्या प्रकारांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामलवाडी पोलिसांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन अवैध दारू विक्री आणि गुटखा विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, तसेच गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत, अशी जोरदार मागणी सुरतगावातील ग्रामस्थांतून होत आहे.