धाराशिव (प्रतिनिधी)- दिव्यांग खेळाडूंमधील क्रीडागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने सोमवार, दि. 23 नोव्हेंबर 2026 रोजी पॅरा आर्चरी (धनुर्विद्या) जिल्हास्तरीय स्पर्धा व राज्य निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग धनुर्धरांना राज्यस्तरावर आपल्या कौशल्याची छाप उमटविण्याची ही महत्त्वपूर्ण संधी ठरणार असल्याची माहिती धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्ष मयूर काकडे यांनी दिली.

धाराशिव येथील जिल्हा धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट कॉलेज) मैदान, बार्शी नाका येथे या स्पर्धा पार पडणार आहेत. स्पर्धेला सकाळी ठीक 10 वाजता प्रारंभ होणार असून, या स्पर्धेतून वाशिम येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्यातील पात्र दिव्यांग धनुर्धरांची निवड करण्यात येणार आहे.

या स्पर्धेमध्ये इंडियन, कंपाउंड व रिकर्व्ह या तीन प्रकारांचा समावेश असून, खुल्या वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी आपापल्या प्रशिक्षकांमार्फत दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, बोनाफाईड प्रमाणपत्र व जन्म प्रमाणपत्र या आवश्यक कागदपत्रांच्या रंगीत छायांकित प्रतींसह नोंदणी करणे आवश्यक आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक प्रविण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, स्पर्धा विभाग प्रमुख प्रतापसिंह राठोड, तांत्रिक समिती प्रमुख नितीन जामगे आणि तांत्रिक समिती सचिव कैलास वाटेफळकर यांच्याशी संपर्क साधावा.

दिव्यांग खेळाडूंमधील जिद्द, चिकाटी आणि क्रीडाकौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना राज्यस्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग धनुर्धरांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले कौशल्य सिद्ध करावे, असे आवाहन धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top