वाशी (प्रतिनिधी)-  कन्हेरी येथील सार्वजनिक जागेवरील फलकांवरून निर्माण झालेल्या वादावर प्रशासनाच्या मध्यस्थीने सामंजस्यपूर्ण तोडगा निघाला आहे. गावातील शासकीय जागेवरील सर्व अनधिकृत कट्टे व फलक हटविण्याचा निर्णय दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी एकमताने घेतला. तसेच भविष्यात कायदेशीर परवानगीशिवाय कोणतेही पुतळे, कट्टे किंवा फलक उभारण्यात येणार नसल्याचेही बैठकीत मान्य करण्यात आले.

कन्हेरी येथील मुख्य प्रवेशद्वार व सार्वजनिक जागेवर विनापरवाना फलक लावल्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, वाशी येथे उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी आपापली भूमिका मांडल्यानंतर प्रशासनाच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा झाली. उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी गावातील प्रश्न सामंजस्याने सोडविण्याचे आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे सांगितले. तसेच थोर व्यक्तींचा आदर राखावा, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अथवा विटंबना होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले यांनी दोन्ही गटांनी संयम राखून कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवावा, कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि गावातील शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन केले. हा प्रश्न शांततेत मार्गी लावण्यासाठी पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. बैठकीस तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बांगर, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी  राठोड, मंडळ अधिकारी केदार, ग्राम महसूल अधिकारी राठोड, ग्रामपंचायत प्रशासक कन्हेरी, पोलीस पाटील तसेच विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


 
Top