धाराशिव (प्रतिनिधी)- जिद्द, मेहनत आणि नियमित सरावाच्या जोरावर धाराशिवच्या स्केटिंगपटूंनी राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. रोलर हॉकी आणि इनलाईन हॉकी या दोन प्रकारांत जिल्ह्यातील तब्बल 17 खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली असून, हे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
भारतीय रोलर स्केटिंग महासंघ व कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बंगळुरू येथे 5 ते 15 डिसेंबर या कालावधीत 64 वी राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धा पार पडणार आहे. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्यानंतर या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात संधी मिळाली आहे. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये रोलर हॉकी प्रकारात रक्षित अजमेरा याचा समावेश आहे. तर इनलाईन हॉकी प्रकारात नमन गडदे, अथर्व शानमे, अखिलेश राजेनिंबाळकर, रुही चौरे, अरफीया पटेल, संस्कृती बोराडे, आराध्या धस, स्वरा जेवळीकर, अनुष्का शानमे, गौरवी सिरसाळकर, प्रतीक हिरोळे, अभिराज काळे, अनुकल्प येळवे, कृष्णा माकोडे, श्रीलेश शिंदे आणि आर्यन चौधरी या खेळाडूंनी महाराष्ट्र संघात स्थान निश्चित केले आहे.
या खेळाडूंना जिल्हा संघटनेचे मुख्य प्रशिक्षक तथा सचिव प्रविण गडदे, मुख्य प्रशिक्षक तथा कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, तसेच प्रशिक्षक कैलास लांडगे, अभिजीत कंदले, अजिंक्य जाधव आणि यशोदीप कदम यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे खेळाडूंचा नियमित सराव सुरू असून, राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी विशेष तयारी केली जात आहे.
