तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिरात रविवार, दिनांक 1 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10.25 वाजण्याच्या सुमारास गाभाऱ्यात सुरक्षा रक्षक सागर अशोक भिसे यांना एक पर्स आढळून आली.
सुरक्षा रक्षक सागर भिसे यांनी तत्काळ ती पर्स दर्शन मंडप नियंत्रण कक्षात जमा केली. नियंत्रण कक्षात पर्सची तपासणी केली असता, त्यामध्ये 10 हजार रुपये रोख रक्कम, सोन्यासदृश मंगळसूत्र तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे आढळून आली. पर्समधील कागदपत्रांच्या आधारे संबंधित महिला भाविकाचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर आरती भगवान शिंदे (रा. सोलापूर) यांना दर्शन मंडप नियंत्रण कक्षात बोलावून शहानिशा करण्यात आली. खातरजमा झाल्यानंतर त्यांना त्यांची पर्स परत करण्यात आली. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सहायक सुरक्षा निरीक्षक ओम खुरुद व सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.
