धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ. शिल्पा प्रतापसिंह पाटील यांनी धाराशिव येथील विविध शैक्षणिक संस्था आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेऊन पदवीधरांच्या प्रश्नांवर संवाद साधला. या भेटीदरम्यान सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी, रखडलेल्या भरती प्रक्रिया, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि पदवीधरांचे न्याय्य हक्क या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
डॉ. शिल्पा प्रतापसिंह पाटील यांनी धाराशिव येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, बिल गेट्स कॉलेज,कन्या प्रशाला आणि विठ्ठल पतसंस्था येथे भेट देऊन संबंधित संस्थांमधील मान्यवरांशी संवाद साधला. आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधरांच्या विविध समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थिती जाणून घेण्यावर या संवादात भर देण्यात आला.
शिक्षण क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण, शैक्षणिक संस्थांसमोरील आव्हाने, विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या संधी आणि उच्चशिक्षणानंतरच्या रोजगाराच्या शक्यता या विषयांवरही संवाद साधण्यात आला. पदवीधरांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळणे, त्यांच्या समस्या सक्षमपणे मांडल्या जाणे आणि संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी पाठपुरावा होणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
