धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक अंडा दिनानिमित्त शुक्रवार, दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी स्वा. सै. ॲड. काशीराव पाटील पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन विद्यालय, वाशी येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर यांच्या निर्देश व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह पोल्ट्री उद्योजकांना अंड्यांचे पौष्टिक महत्त्व, आहारातील अंड्यांचे फायदे आणि पोल्ट्री व्यवसायातील रोजगार व उद्योजकतेच्या संधी याविषयी माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित विद्यार्थी आणि पोल्ट्री उद्योजकांना जागतिक अंडा दिनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. अंड्यांमध्ये असलेली उच्च दर्जाची प्रथिने, विविध जीवनसत्त्वे आणि खनिजद्रव्ये यांमुळे अंडे हा संतुलित आहारातील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगण्यात आले. शरीराची वाढ, स्नायूंचे आरोग्य आणि सर्वांगीण पोषणासाठी अंड्यांचा आहारात योग्य प्रकारे समावेश करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.


पोल्ट्री व्यवसायातील संधींची माहिती

या कार्यक्रमाला पोल्ट्री उद्योजक माऊली कराळे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पशुपालकांना पोल्ट्री व्यवसायातील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कुक्कुटपालनाचे शास्त्रीय व्यवस्थापन, अंडी उत्पादनातील गुणवत्ता आणि बाजारपेठेतील मागणी यांचा विचार करून पोल्ट्री व्यवसाय अधिक फायदेशीर व शाश्वत कसा करता येईल, याविषयी त्यांनी माहिती दिली. अंडी उत्पादनामध्ये कोंबड्यांचे आरोग्य, संतुलित पोषण, स्वच्छ व सुरक्षित पाणी, जैवसुरक्षा, योग्य शेड व्यवस्थापन, पुरेसे वायुविजन आणि रोगांचे प्रभावी नियंत्रण या बाबींची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे माऊली कराळे यांनी सांगितले.

आजच्या काळात केवळ जास्त अंडी उत्पादन करणे पुरेसे नसून सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि सातत्यपूर्ण अंडी उत्पादनावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी कुक्कुटपालकांनी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून कोंबड्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जागतिक अंडा दिनानिमित्त अंड्यांच्या पोषणमूल्यांविषयी जनजागृती करण्यासाठी उपस्थितांना अंड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून अंड्यांचा दैनंदिन आहारातील समावेश, त्यांचे आरोग्यविषयक फायदे आणि अंड्यांच्या सेवनाबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी विद्यार्थी व पशुपालकांना जागतिक अंडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अंड्यांचे पोषणमूल्य, संतुलित आहारातील त्यांचे महत्त्व आणि कुक्कुटपालन व्यवसायातून उपलब्ध होणाऱ्या संधी यांची माहिती समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथील अधिष्ठाता (निम्न शिक्षण), पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीरचे सहयोगी अधिष्ठाता तसेच समन्वयक डॉ. अनिल पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विद्यार्थी आणि पोल्ट्री उद्योजकांना पोषण, आरोग्य आणि कुक्कुटपालन व्यवसायातील संधी यांची माहिती देणारा हा कार्यक्रम जागतिक अंडा दिनानिमित्त जनजागृती करणारा ठरला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील सुशिक्षित तरुण, शिक्षक, प्राध्यापक आणि विविध क्षेत्रांतील पदवीधरांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत डॉ. शिल्पा पाटील यांनी संस्थांमधील मान्यवरांच्या सूचना आणि मते जाणून घेतली.


 
Top