धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच शेतकरी आणि शेतकरी कुटुंबांना विशेष आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार ओमप्रकाश भुपालसिंह ऊर्फ पवन राजेनिंबाळकर यांनी केली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असून, पावसाच्या अनियमिततेमुळे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पादन, पशुधन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न यावर गंभीर परिणाम होत आहेत. पीक नुकसान, वाढते कर्ज, कर्जफेडीचा ताण आणि रोजगाराच्या मर्यादित संधी यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक संकटाचा सामना करत आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने संवेदनशीलतेने आणि वेळेत निर्णय घेणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि केंद्र सरकारकडे तातडीने सकारात्मक अहवाल सादर करून विशेष मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रलंबित पीकविमा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी,

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत, शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी मुदतवाढ, दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पशुधनासाठी चारा, सिंचन सुविधा आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. 


 
Top