धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट गणेश मंडळ व गौरी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या तसेच सहभागी सर्व गणेश मंडळांचा धाराशिव जिल्हा काँग्रेस भवन येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात गौरव करण्यात आला.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने, धनंजय राऊत, प्रशांत पाटील यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मंडळांना ट्रॉफी, पक्षाचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत धाराशिव शहरातून विजय चौक तरुण गणेश मंडळ धाराशिव मंडळाने प्रथम क्रमांक, श्री बाल हनुमान गणेश मंडळ गवळी गल्ली मंडळाने द्वितीय क्रमांक, तर हिंगळजमाता गणेश मंडळ धाराशिव मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच धाराशिव शहरातून उत्तेजनार्थ छत्रपती संभाजी चौक गणेश मंडळ व श्री समर्थ राजा गणेश मंडळ धाराशिव यांनी क्रमांक पटकाविले.
उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत तालुका स्तरामधून ढोकी येथील कामगार गणेश मंडळाने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक कोंड येथील शिवभक्त गणेश मंडळ, तर आंबेजवळगा येथील साठे तरुण गणेश मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या मंडळांचा त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांसाठी विशेष गौरव करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या मंडळांच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले. भविष्यातही मंडळांनी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. तसेच मिरवणूक देखावा व गणेश मंडळाच्या अडचणी यावेळी जाणून घेण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांनी सर्व सहभागी मंडळांचे स्वागत करून विजेत्या मंडळांचे अभिनंदन केले. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा आणि समाजसेवेचे माध्यम ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सहभागी सर्व मंडळांना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सन्मान सोहळ्यास जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्यासह विश्वास शिंदे,राजेंद्र शेरखाने, धनंजय राऊत, प्रशांत पाटील,अशोक बापू शेळके, अग्निवेश शिंदे, शिवाजी गायकवाड, शहाजी मुंढे, गोकुळ सुरवसे, हरिदास शिंदे, अंकुश पेठे,अविनाश रणखांब, दयानंद नागपुरे, अशोक बनसोडे, मोइब शेख,बाबा मोमीन, पोपट शिंदे, मौलाना शौकत,जुबेर शहा, बालाजी राठोड, ज्योतीराम निमसे, महावीर चव्हाण आदी पदाधिकारी तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
