धाराशिव (प्रतिनिधी)- मागच्या वर्षी याच शेतात दहा-बारा क्विंटल सोयाबीन झाले होते.यंदा झाडाला शेंगाही नाहीत.उभे पीक काढायला येणारा खर्चसुद्धा परवडत नाही.आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा करचखेडा येथील शेतकऱ्यांच्या या व्यथेतून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची भीषणता केंद्रीय पथकासमोर उलगडली.कुठे पाण्याअभावी करपलेला ऊस,कुठे शेंगाविना उभे असलेले सोयाबीन तर कुठे वाळणाऱ्या द्राक्षबागा,कोरड्या पडलेल्या विहिरी आणि तलाव.वर्षभर काबाडकष्ट करूनही हाती काहीच लागणार नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा थेट केंद्रीय पथकासमोर मांडल्या.
खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर आता रब्बी हंगामही धोक्यात आल्याचे विदारक वास्तव या पाहणी दौऱ्यातून समोर आले. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची आज 10 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज धाराशिव,वाशी आणि भूम तालुक्यांतील विविध गावांना भेटी देऊन पीक नुकसान,पाण्याची उपलब्धता, कोरडे पडलेले जलस्रोत,चारा टंचाई आणि पशुधनासमोरील अडचणींची माहिती घेतली.या पथकात नीती आयोगाचे सल्लागार डॉ.जसपाल सिंग आणि केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ.साक्षी भदौरिया यांचा समावेश होता.या पाहणी दौऱ्यात करचखेडा येथे आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खळकाळे, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
करचखेड्यात सोयाबीनला शेंगाच नाहीत ; शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतली
धाराशिव तालुक्यातील करचखेडा शिवारात केंद्रीय पथकाने शेतकरी बळी भोसले यांच्या शेतातील सोयाबीन आणि ऊस पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी भोसले यांनी पथकासमोर शेतीची सद्यस्थिती मांडली.मागील वर्षी याच शेतातून दहा ते बारा क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले होते. मात्र,यंदा पावसाअभावी सोयाबीनच्या झाडांना शेंगाही लागलेल्या नाहीत. उभ्या पिकातून उत्पादन मिळण्याची आशा मावळली असून,पीक काढणीसाठी लागणारा खर्चही परवडणारा नाही,असे त्यांनी सांगितले. शेताशेजारी असलेला पाटबंधारे विभागाचा तलाव मागील वर्षी पूर्ण क्षमतेने भरलेला होता.मात्र,यंदा हा तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे.त्यामुळे शेतीसाठी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.केंद्रीय पथकाने या तलावाचीही पाहणी करून मागील वर्षीच्या पाणीसाठ्याची माहिती घेतली.
करचखेडा येथील ऊस उत्पादक शेतकरी नामदेव भोसले यांनीही आपल्या व्यथा केंद्रीय पथकासमोर मांडल्या.मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात दीड एकर क्षेत्रावर ऊस लागवड केली.मोठ्या अपेक्षेने पीक उभे केले.मात्र,यंदा पाणीच नसल्याने ऊसाचे उत्पादन मिळण्याची शक्यता राहिलेली नाही.शेतीतून उत्पन्नच मिळाले नाही,तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींची माहिती पथकाने जाणून घेतली.यावेळी दूध उत्पादक महिला शेतकरी मंगला भोसले यांच्याशीही पथकाने संवाद साधून दुग्धव्यवसायाच्या परिस्थितीची माहिती घेतली.
आळणीत ऊस पिकाची पाहणी : येडशीत 60 फूट विहीरही कोरडी
धाराशिव तालुक्यातील आळणी येथे शेतकरी स्वराज वीर यांच्या ऊस पिकाच्या नुकसानीची केंद्रीय पथकाने पाहणी केली. पाण्याअभावी ऊस पिकावर झालेल्या परिणामांची माहिती त्यांच्याकडून घेतली. त्यानंतर येडशी येथील शेतकरी बाळू लवटे यांच्या शेताला पथकाने भेट दिली.रोजगार हमी योजनेतून मागील वर्षी तयार केलेली तब्बल 60 फूट खोल विहीर यंदा पूर्णपणे कोरडी पडल्याचे त्यांनी पथकाच्या निदर्शनास आणून दिले.
मागच्या वर्षी शेतात सोयाबीन, राजमा आणि मका घेतला होता.यंदा पाण्याअभावी खरीप हंगाम हातचा गेला.आता विहिरीत पाण्याचा थेंबही नसल्याने रब्बी हंगामात पिके घेणे शक्य होणार नाही,अशी व्यथा लवटे यांनी व्यक्त केली.
शेतात विहीर असूनही पाणी नसल्याने शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेली असहाय्यता या पाहणीतून स्पष्ट झाली.केंद्रीय पथकाने येडशीजवळील तलावाचीही पाहणी केली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे-पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी त्यांनीही जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतची पथकाला दिली.
वाशी तालुक्यातील खानापूर येथे शेतकरी दिगंबर नकाते यांच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची केंद्रीय पथकाने पाहणी केली. नकाते यांनी आतापर्यंत या बागेतून द्राक्षाची पाच पिके घेतली आहेत.मात्र, यंदा पाण्याअभावी द्राक्षाचे उत्पादन घेणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने द्राक्षवेली वाळू लागल्या असून,मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची माहिती त्यांनी पथकाला दिली. द्राक्षबाग उभी करण्यासाठी आणि ती अनेक वर्षे जोपासण्यासाठी केलेली मेहनत पाण्याअभावी संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले.पथकाने द्राक्षबागेची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची माहिती जाणून घेतली. खानापूर येथे केंद्रीय पथकाने रणजीत लगाडे यांच्याकडून दुधाळ जनावरांची माहिती घेतली.यावेळी जनावरांसाठी चारा शिल्लक नसल्याचे त्यांनी सांगितले. खानापूर गावातून दररोज जवळपास दीड हजार लिटर दूध संकलित होते.हे दूध दोन ते तीन डेअरींना विक्रीसाठी पाठविण्यात येते.मात्र,चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे आगामी काळात दूध उत्पादनात मोठी घट होण्याची भीती पशुपालकांनी व्यक्त केली.गावातील अनेक शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन करतात.शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना या पूरक व्यवसायांमुळे कुटुंबांना आर्थिक आधार मिळतो.मात्र,यंदाच्या नापिकीमुळे शेतीबरोबरच हे व्यवसायही धोक्यात आले आहेत.शेतीत पीक नाही आणि जनावरांना चारा नाही.अशा परिस्थितीत शेतीसोबत दुग्धव्यवसाय कसा टिकवायचा,हा पशुपालकांसमोरील प्रश्न पथकाच्या पाहणीतून पुढे आला.या भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे,तहसीलदार श्री.म्हेत्रे तसेच तालुकास्तरीय यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
वाशी तालुक्यातील शेतकरी राजू बोळणकर यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीचीही केंद्रीय पथकाने पाहणी केली.बोळणकर यांनी तीन एकर क्षेत्रातील सोयाबीन पिकासाठी सुमारे 45 हजार रुपये खर्च केला आहे.मात्र, पाण्याअभावी पीक उभे असूनही झाडांना शेंगा लागलेल्या नाहीत.त्यामुळे आतापर्यंत उत्पादन हाती आलेले नाही.पुरेसे पाणी मिळाले असते,तर तीन एकरांत जवळपास 20 क्विंटल सोयाबीन झाले असते.आता मात्र उभे पीक काढण्यासाठी येणारा खर्चही परवडणार नाही.रब्बी हंगामासाठीही पाणी उपलब्ध नाही,अशी माहिती त्यांनी पथकाला दिली. केंद्रीय पथकाने त्यांच्या शेताजवळील सुमारे 100 हेक्टर क्षेत्रावरील पाझर तलावाची पाहणी केली.तसेच मागील वर्षी तलावात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची माहिती जाणून घेतली.
वाशी तालुक्यातील पिंपळगाव (क) येथील श्री.रामकृष्ण हरी गोशाळेलाही केंद्रीय पथकाने भेट दिली.यावेळी गोशाळेचे किसन रसाळ यांनी जनावरांची संख्या, चारा,पाणी आणि व्यवस्थापनाची माहिती दिली. या गोशाळेत एकूण 57 जनावरे असून, त्यामध्ये मोठी आणि लहान जनावरे आहेत.सध्या गोशाळेत जनावरांसाठी सुमारे तीन महिन्यांचा चारा उपलब्ध असल्याचे रसाळ यांनी सांगितले. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलचा वापर करण्यात येतो. गोशाळेतून गोमूत्राची विक्री केली जाते,तर शेणखताचा वापर शेतीसाठी करण्यात येतो,अशी माहितीही त्यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीत गोशाळांमधील जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केंद्रीय पथकाच्या निदर्शनास आणून दिले.गोशाळांमधील जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठीही मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भूम तालुक्यातील हाडोंग्री येथे शेतकरी सुधीर क्षीरसागर यांच्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची केंद्रीय पथकाने पाहणी केली.यंदा शेतातून आठ क्विंटल सोयाबीन मिळेल,अशी अपेक्षा होती.मात्र, पाण्याअभावी पिकाचे एवढे नुकसान झाले की,आता 70 किलो सोयाबीनही निघणार नाही,अशी व्यथा क्षीरसागर यांनी पथकासमोर मांडली.
हाडोंग्री परिसरातील जमीन डोंगराळ असल्यामुळे येथील अनेक शेतकरी शेतीबरोबरच पशुपालन आणि दुग्धव्यवसाय करतात.मात्र,पाण्याअभावी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरांचे संगोपन कसे करायचे, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.चारा उपलब्ध नसल्यास जनावरांचे पालनपोषण करणे कठीण होणार असून, त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. शेतीतील उत्पन्न घटत असताना पशुपालनातून मिळणारा आर्थिक आधारही कमी होण्याची भीती या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.हाडोंग्री येथील पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी ज्योती चव्हाण आणि तहसीलदार श्री.पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुजार यांनी मांडली शेती,पाणी आणि पशुधनाची परिस्थिती
केंद्रीय पथकाच्या संपूर्ण पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या विविध पैलूंकडे पथकाचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, पाण्याअभावी निर्माण झालेल्या अडचणी, कोरडे पडलेले तलाव आणि विहिरी, जनावरांसाठी चाऱ्याची गरज तसेच गोशाळांसमोरील प्रश्न या बाबी पाहणी दौऱ्यात समोर आल्या.पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची अवस्था पाहिली. शेतकऱ्यांशी संवाद साधून मागील वर्षीचे उत्पादन,यंदा झालेले नुकसान,शेतीवरील खर्च आणि आगामी रब्बी हंगामातील अडचणी यांची माहिती घेतली.त्याचबरोबर पशुपालकांकडून चारा व पाण्याची उपलब्धता आणि दुग्धव्यवसायावरील परिणाम जाणून घेतले. या दौऱ्यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कटकधोंड,जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मांजरमकर तसेच विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

