धाराशिव (प्रतिनिधी)- दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता हा पशुपालकांसमोरील मोठा प्रश्न असून,उपलब्ध असलेल्या निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याचा अधिकाधिक उपयोग पशुधनासाठी करणे आवश्यक आहे.चाऱ्याची उपलब्धता मर्यादित असताना उपलब्ध साधनसंपत्तीचा काटकसरीने आणि प्रभावीपणे वापर करण्यावर भर द्यावा,या अनुषंगाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी परंडा तालुक्यातील वडनेर येथील श्रीकृष्ण गोशाळेला भेट देऊन चारा व्यवस्थापनासह गोशाळेची 7 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष पाहणी केली.

जिल्हाधिकारी पुजार यांनी गोशाळेतील पशुधन,उपलब्ध चारा तसेच त्याच्या व्यवस्थापनाची माहिती जाणून घेतली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनाला आवश्यक चारा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या चाऱ्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करण्याचे महत्त्व यावेळी पटवून देण्यात आले. या पाहणीवेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,उपविभागीय अधिकारी ज्योती चौहान,तहसीलदार काकडे, सहायक गट विकास अधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पल्ला इम्रान यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व अन्य अधिकारी तसेच उपस्थित गावकऱ्यांसमोर युरिया व गुळाच्या वापरातून निकृष्ट दर्जाचा चारा सकस करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.

निकृष्ट दर्जाचा चारा थेट पशुधनाला देण्याऐवजी त्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया केल्यास त्याची पौष्टिकता वाढवून तो पशुधनासाठी अधिक उपयुक्त करता येतो.विशेषतः दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध चाऱ्याचा प्रभावी वापर करण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरू शकते,असे डॉ.पल्ला इम्रान यांनी यावेळी सांगितले.


चाऱ्याची प्रत्येक काडी पशुपालकासाठी मोलाची

दुष्काळी परिस्थिती तीव्र झाली की शेतकऱ्यापुढे केवळ पिके वाचविण्याचाच नव्हे,तर गोठ्यातील पशुधन जगविण्याचाही प्रश्न उभा राहतो.हिरवा आणि सकस चारा कमी होत असताना हाताशी उपलब्ध असलेला निकृष्ट चारा टाकून देण्याऐवजी त्यावर योग्य प्रक्रिया करून पशुखाद्य म्हणून वापरता आल्यास पशुपालकांना मोठा आधार मिळू शकतो.


युरिया व गुळाच्या साहाय्याने निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविण्याची पद्धत प्रत्यक्ष पाहता आल्याने उपस्थित गावकऱ्यांनाही या तंत्राचे महत्त्व समजले.दुष्काळात उपलब्ध चाऱ्याच्या प्रत्येक काडीचा योग्य उपयोग करून पशुधनाच्या पोषणाची गरज भागविण्यासाठी अशा शास्त्रीय पद्धती पशुपालकांसाठी उपयुक्त ठरू शकतात, याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.


पशुधन हे ग्रामीण कुटुंबांच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा आधार आहे.दूध उत्पादनासह शेतीपूरक उत्पन्नाची जोड पशुधनातून मिळत असल्याने दुष्काळात चाऱ्याअभावी पशुधनाच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये,यासाठी चारा व्यवस्थापनाला विशेष महत्त्व आहे.जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्या प्रत्यक्ष भेटीतून दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या चारा व्यवस्थापनाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आहे.

 
Top