धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्यात कुठेही भारनियमन नसल्याचा दावा शासनाकडून केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात मात्र ‌‘अंडर फ्रिक्वेन्सी' आणि ‌‘इमर्जन्सी लोडशेडिंग'च्या गोंडस नावाखाली वारंवार वीज कपात सुरू असल्याचा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे. दुष्काळी परिस्थितीत आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांना विजकपातीचा अतिरिक्त फटका बसत असून ही विजकपात तात्काळ बंद करून जिल्ह्यात अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आमदार पाटील म्हणाले की,छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 19 सप्टेंबर रोजी नांदेड येथील बैठकीत ऊर्जा राज्यमंत्र्यांसमोर महावितरणचे मुंबई येथील संचालक धनंजय औंढेकर यांनी महाराष्ट्रात कुठेही लोडशेडींग नाही असे म्हटले होते. बैठकी नंतर काही दिवस विद्युत पुरवठा सुरळीत चालू राहिला. परंतु, पुन्हा ‌‘अंडर फ्रिक्वेन्सी' व 'इमर्जन्सी लोडशेडिंग' च्या नावाखाली वीज कपात चालूच आहे.  धाराशिव जिल्ह्यात सध्या दुष्काळ जाहीर केला असून भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. विहिरी आणि विंधन विहिरींच्या पाण्याची पातळी घटल्याने नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. उपलब्ध पाण्याचा उपसा करण्यासाठी वीजपुरवठा अत्यावश्यक असताना वारंवार होणाऱ्या विजकपातीमुळे पाणी उपसा करण्यात अडचणी येत.आहेत. परिणामी पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांमध्ये आणखी भर पडत असल्याचे पत्रात म्हंटले आहे.

ऑक्टोबर महिन्यात तीव्र उष्णतेमुळे नागरिक हैराण आहेत. त्यात रात्री गावठाण वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा जवळ आल्या असून रात्रीच्या विजकपातीमुळे अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच आमदार पाटील यांनी सांगितले.


 
Top