तुळजापूर (प्रतिनिधी)- ‌ ‘आई राजा उदे उदे', ‌‘बोल भवानी की जय'च्या जयघोषाने आणि वेदमंत्रोच्चाराच्या मंगलमय वातावरणात महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आज तुळजापुरात उत्साहात प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रविवारच्या सुट्टीमुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती.

नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन गाभारा, मंदिर परिसर तसेच राजेशाही महाद्वारासमोर आकर्षक फुलांची सजावट व रोषणाई करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता. तर ‌‘आई भवानी'च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे श्री तुळजाभवानी देवीची मुख्य मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. त्यानंतर देवीचा पंचामृत अभिषेक व नित्योपचार पूजा करण्यात आली. सकाळी साडेअकराच्या सुमारास मंदिरातील श्रीगोमुखापासून विविध धार्मिक वाद्यांच्या गजरात जलकुंभाची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मंदिर प्रांगणातून सिंहासन गाभाऱ्यात आणण्यात आली.

मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किरण पुजार व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते वेदमंत्रोच्चारात विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष अर्चनाताई गंगणे, नगरसेविका प्रियंकाताई गंगणे, देवीचे महंत तुकोजी बुवा व चिलोजी बुवा, पूजेचे भोपे-पुजारी विनोद सोनजे, प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार माया माने, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, भोपे मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर, पाद्य मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो यांच्यासह सेवेकरी, भोपे-पुजारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंदिरातील घटस्थापनेनंतर तुळजापूर पंचक्रोशीतील घटस्थापनेची परंपराही यंदा मोठ्या उत्साहात पाळण्यात आली. नवरात्रोत्सवाची पहिली माळ आणि रविवारची सुट्टी असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने दर्शनासाठी भाविकांचा जनसागर तुळजापुरात लोटला होता. दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंदिर प्रांगणात श्री देवीजींचा पारंपरिक छबिना काढण्यात आला. त्यानंतर महंत  तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्या हस्ते प्रक्षाळ पूजा करण्यात आली. या धार्मिक विधीनंतर नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक तुळजापुरात दाखल झाले असून, पुढील नऊ दिवस शहरात भक्तिमय वातावरण राहणार आहे.

 
Top