भूम (प्रतिनिधी)- विद्या विकास मंडळ पाथरूड संचलित शंकरराव पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, भूम येथील मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिजात भाषा मराठी सप्ताहाची सांगता उत्साहात करण्यात आली.
दिनांक 3 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहांतर्गत विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांना व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुंदर हस्ताक्षर, निबंध लेखन, काव्यवाचन आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमान, प्रेम आणि साहित्याची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सांगता समारंभास विद्या विकास मंडळ पाथरूड संस्थेचे उपाध्यक्ष डी. डी. बोराडे, शंकरराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जगदाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे, वरिष्ठ प्राध्यापक प्रा. टी. आर. बोराडे, प्रा. डॉ. गोकुळ सुरवसे, प्रा. सोळंके, प्रा. गंगाधर काळे, प्रा. सूर्यवंशी, प्रा. महामुनी, प्रा. अमोल कुटे आदी प्राध्यापक उपस्थित होते.
मराठी भाषा ही समृद्ध साहित्यपरंपरा लाभलेली भाषा असून तिचे जतन, संवर्धन आणि प्रचार-प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेच्या अभिजाततेची जाणीव निर्माण करण्यासाठी सप्ताहाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गोविंद गरड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुहास गांधले यांनी केले. या उपक्रमामुळे महाविद्यालयात मराठी भाषेविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
