तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी तुळजाईनगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत शुक्रवारी देवी दर्शनार्थ सार्वजनिक गणेश मंडळांनी भवानी ज्योत मंदिरात प्रज्वलित करून नेण्यासाठी मोठी गर्दी केली होती तसेच कर्नाटक राज्यातील भाविक व बंजारा समाजातील भाविकांची मोठी गर्दी आज दिसून आले तुळजापूर शहरात प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून, देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. भाविकांना दर्शनासाठी प्रतीक्षा करताना उन्ह, पाऊस तसेच गर्दीचा त्रास होऊ नये, यासाठी घाटशीळ परिसरात दोन भव्य दर्शन मंडप उभारण्यात आले आहेत.
घाटशीळ परिसरात 100 बाय 100 आकाराचे दोन वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले असून, स्ट्रक्चरसह उभारण्यात आलेल्या या मंडपांमध्ये एकाच वेळी सुमारे 20 हजार भाविकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी मंडप वॉटरप्रूफ करण्यात आले असून, भाविकांच्या सोयीसाठी पंख्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. दर्शन मंडपामध्ये भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. भाविकांना मंदिरातील दर्शनाची माहिती मिळावी यासाठी लाईव्ह दर्शन टीव्ही स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार असून, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
विविध सुविधांचे स्वतंत्र कक्ष
भाविकांच्या सुरक्षिततेसह आरोग्य आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी दर्शन मंडपाच्या आवारात विविध कक्ष उभारण्यात आले आहेत. यामध्ये पोलीस मदत केंद्र, भाविक विश्रांती कक्ष, आयसीयू कक्ष, प्रथमोपचार केंद्र, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन कक्ष आणि पाणपोई यांचा समावेश आहे. याशिवाय भाविकांना चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टॅण्ड, महिलांसाठी हिरकणी कक्ष, तसेच ‘पे डदर्शन पास कक्ष आणि नगरपरिषदेचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा एकाच परिसरात उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
10 ते 27 ऑक्टोबरपर्यंत दर्शन व्यवस्था
घाटशीळ येथील या दर्शन मंडपातून भाविकांना दि. 10 ऑक्टोबरपासून मंदिर दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत म्हणजेच दि. 27 ऑक्टोबरपर्यंत या दर्शन मंडपातून भाविकांना टप्प्याटप्प्याने मंदिराकडे दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. नवरात्र महोत्सवात तुळजापूरमध्ये राज्याच्या विविध भागांतून तसेच परराज्यांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असल्याने गर्दीचे नियोजन, भाविकांची सुरक्षितता, आरोग्य सुविधा आणि दर्शन व्यवस्था यांना यंदा विशेष महत्त्व देण्यात आले आहे. घाटशीळ येथील या भव्य दर्शन मंडपामुळे भाविकांना प्रतीक्षा काळात निवारा मिळण्याबरोबरच सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने देवीच्या दर्शनासाठी जाता येणार आहे.

