धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. टी. सी. उकीरडे यांनी ‌‘मराठी भाषेचे वैश्विक महत्त्व' या विषयावर मार्गदर्शन केले.

आपल्या भाषणात प्रा. उकीरडे यांनी मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यिक वारसा आणि जागतिक स्तरावरील महत्त्व विशद केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि समृद्ध विचारपरंपरेची वाहक आहे. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. मंजुळकर यांनी मराठी भाषेच्या भविष्याविषयी विश्वास व्यक्त केला. मराठी भाषा ही समृद्ध साहित्यपरंपरा, संतवाङ्मय आणि लोकसंस्कृतीने संपन्न असून ती कधीच नष्ट होणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. नव्या पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले, तर प्रा. सुशांत जाधवर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला मराठी विभागप्रमुख प्रा. राजा जगताप, प्रा. डॉ. वैशाली बोबडे, प्रा. गेंगजे, प्रा. विवेकानंद चव्हाण यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top