धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या तुळजापूर येथील पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता नववी व अकरावीच्या लेटरल एन्ट्री (पार्श्व प्रवेश) प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके आणि उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दत्तात्रय लांडगे यांनी केले आहे.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागांतर्गत कार्यरत असलेले पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, तुळजापूर हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई), नवी दिल्लीशी संलग्न निवासी विद्यालय आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निवासी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या विद्यालयात इयत्ता नववी व अकरावीच्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी लेटरल एन्ट्री प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता नववी व अकरावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही प्रवेश परीक्षा शनिवार,10 एप्रिल 2027 रोजी तुळजापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून,अर्ज करण्याची अंतिम मुदत यापूर्वी 30 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली होती.मात्र,विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी आणखी संधी मिळावी,या उद्देशाने ही मुदत आता 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.इयत्ता आठवीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्ष 2027-28 मध्ये इयत्ता नववीत प्रवेश दिला जाणार आहे.या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in/2026/nvsix या संकेतस्थळावर जाऊन 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेश ही एक महत्त्वाची संधी आहे.विशेषतः ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना निवासी वातावरणात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते.त्यामुळे जिल्ह्यातील पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा विचार करून या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा.तसेच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश परीक्षेची माहिती पोहोचवून त्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे,असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी सुधा साळुंके व जिल्हा उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे यांनी केले आहे

प्रवेश परीक्षेबाबत अधिक माहिती किंवा अर्ज प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन आवश्यक असल्यास परीक्षा प्रमुख डी.डी.राऊत यांच्याशी 8862008190 या क्रमांकावर, तर सहायक परीक्षा प्रमुख एस.आर. गज्जम यांच्याशी 9921730357 या क्रमांकावर संपर्क साधावा,अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य ए.एस.कांबळे यांनी दिली. पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आपले ऑनलाइन अर्ज वेळेत भरावेत.जिल्ह्यातील एकही इच्छुक व पात्र विद्यार्थी केवळ माहितीअभावी या संधीपासून वंचित राहू नये,यासाठी पालक,शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन विद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top