भूम (प्रतिनिधी)- संकटाच्या काळात दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे, मुक्या जीवांप्रती माया जपणे आणि स्वतःच्या जिवाची पर्वा न करता एखाद्या जीवाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करणे, हीच खऱ्या माणुसकीची ओळख आहे. याचा प्रत्यय भूम तालुक्यातील सुकटा येथे आला. चारा चरता चरता विहिरीत पडलेल्या बैलाला वाचवण्यासाठी शेतकरी तानाजी पांढरे आणि बाबू पुरी यांनी आपल्या सहकारी शेतकऱ्यांच्या मदतीने अथक प्रयत्न केले. तब्बल तीन तास विहिरीत अडकलेल्या या मुक्या जीवाला अखेर ट्रॅक्टर व क्रेनच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या शेतकरी बांधवांच्या धाडसाचे आणि माणुसकीचे कौतुक होत आहे.
भूम तालुक्यातील सुकटा येथील शेतकरी अंकुश नरके यांचा बैल चारा चरता चरता अचानक विहिरीत पडला. ही घटना समजताच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली. विहिरीत अडकलेल्या बैलाला बाहेर काढणे हे मोठे आव्हान होते. बैलाला वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत तानाजी पांढरे आणि बाबू पुरी यांनी वेळ न घालवता मदतीसाठी पुढाकार घेतला.
दोघांनी आपल्या सहकारी शेतकऱ्यांना सोबत घेऊन बैलाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बैलाला कोणतीही इजा होऊ नये, याची काळजी घेत ट्रॅक्टर आणि क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य करण्यात आले. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर बैलाला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. या प्रयत्नांमुळे शेतकरी अंकुश नरके यांच्या बैलाचे प्राण वाचले. संकटात धावून येणारी माणसे हीच खरी संपत्ती असल्याचा प्रत्यय यावेळेस आला.
