भूम (प्रतिनिधी)-  वाचन ही केवळ ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली आहे. पुस्तकांच्या सहवासातून विचारांना दिशा मिळते. कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यात ज्ञानाची ओढ वाढावी, या उद्देशाने भूम येथील शंकरराव पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि युवा पिढीचे प्रेरणास्थान डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. नियमित वाचनामुळे ज्ञानाचा विस्तार होतो, भाषिक कौशल्ये विकसित होतात, विचार करण्याची क्षमता वाढते आणि आत्मविश्वास निर्माण होतो. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अनावश्यक वापरापासून दूर राहून पुस्तके, वर्तमानपत्रे, चरित्रे आणि ज्ञानवर्धक साहित्याचे नियमित वाचन करावे. वाचनाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या ज्ञानाच्या, कर्तृत्वाच्या आणि साधेपणाच्या बळावर देशातील लाखो तरुणांसमोर आदर्श निर्माण केला. त्यांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचा अंगीकार करून विद्यार्थ्यांनी ज्ञान, जिज्ञासा आणि परिश्रम यांच्या जोरावर आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, हा वाचन प्रेरणा दिनाचा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमास वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचन संस्कृती रुजविण्याचा आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानार्जनाची प्रेरणा निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

 
Top