धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि.10 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत महिला व बाल विकास विभाग, धाराशिव यांच्या वतीने महिला व बालविकास विभागाच्या विविध शासकीय योजना व कायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती रथ व पथनाट्य अभियानाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव करण्यात आले.

या अभियानाच्या माध्यमातून तुळजाभवानी नवरात्र महोत्सवासाठी येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील भाविकांमध्ये तसेच नागरिकांमध्ये महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.महिला व बाल विकास विभागाच्या विविध शासकीय योजना,महिला सक्षमीकरण, बालकांचे हक्क व संरक्षण, बालविवाह प्रतिबंध,बालमजुरी प्रतिबंध,बालभिक्षेकरी रोखणे, तसेच हरवलेल्या बालकांच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत जनजागृती रथ व पथनाट्याच्या माध्यमातून विविध ठिकाणी प्रभावीपणे माहिती प्रसारित करण्यात येणार असून,महिला व बालकांच्या समस्या आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय यंत्रणांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबत सामाजिक जाणीव वाढण्यास तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभगरजूंपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

फिरत्या रथाला विभागाच्या योजना व कायदेबाबत बॅनर्स व जिंगल्सद्वारे तचेस पथनाटयद्वारे कौटुंबिक हिंसाचार,बालविवाह, बाल भिक्षेकरी,चाईल्ड हेल्प लाईन (1098), हुंडा प्रतिबंध,कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ, अपराधी परिविक्षा अधिनियम, महिला समुपदेशन केंद्र,सखी वन स्टॉप सेंटर,बाल संगोपन योजना, बेटी बचाव बेटी पढाव,अनाथ प्रमाणपत्र,मुलांसाठी बालगृह, महिलांसाठी शक्ती सदन केंद्र, नोकरी करणा-या महिलांसाठी सखी निवास या सर्व योजना /कायदे याची प्रचार प्रसिध्दी 10 दिवस करण्यात येणार आहे.तसेच विभागाच्या सर्व योजना व कायदेविषयक माहितीचे फलक संपुर्ण शहरात लावण्यात आलेले आहेत. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे व सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाच्या काळात विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या जनजागृती अभियानास नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन विभागाने करण्यात आले.

 
Top