भूम (प्रतिनिधी)- ऐतिहासिक वारसा, धार्मिक श्रद्धा आणि पिढ्यान्पिढ्या जपल्या जाणाऱ्या परंपरांचा अनोखा संगम म्हणजे भूम शहरातील ऐतिहासिक श्री जगदंबा देऊळ भूम. सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंदिरात दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी, महाआरती आणि महाप्रसादाच्या माध्यमातून आदिशक्तीचा जागर सुरू आहे.
भूम शहराच्या धार्मिक आणि ऐतिहासिक ओळखीत श्री जगदंबा देऊळ भूम ला विशेष महत्त्व आहे. पुरातन गाभारा, अवशेष आणि मंदिर परिसरातील ऐतिहासिक वास्तू या मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. उपलब्ध माहितीनुसार, मंदिराची स्थापना सन 1710 च्या सुमारास झाल्याचे सांगितले जाते. ऐतिहासिक संघर्षांच्या काळात या परिसराला महत्त्व प्राप्त झाले होते. गणाजी भोसले (सुपेकर) हे भोप्याचे रूप धारण करून भूम येथे आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून विनायक झगडे यांच्या मदतीने जगदंबा देऊळ या देवस्थानाची स्थापना झाल्याची परंपरागत माहितीही सांगितली जाते.
51 वर्षांपासून एकाच कुंभाराकडून घट आणण्याची परंपरा
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 51 वर्षांपासून नवरात्रोत्सवासाठी एकाच कुंभाराकडून घट आणण्याची परंपरा आजही जपली जात आहे. देवीला दही दूध आणि स्नान घातल्यानंतर व तसेच घटस्थापना झाल्यानंतर देवीची महाआरती केली जाते. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. मंदिरापासून शहरातून या धार्मिक परंपरांमुळे नवरात्र महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
घटस्थापनेच्या दिवशी भूम मधील गवळी कुटुंबीयांकडून दही-दूध आणून देवी-देवतांना अभिषेक घालण्याची परंपराही आजही जपली जाते आहे. नवरात्रोत्सवात देवीची महाआरती, महाप्रसाद, एकता दौड, आराधी गाणी आणि अष्टमीला होम असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची विशेष श्रद्धा
मंदिरात माहूरच्या रेणुकादेवीसह तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मूर्तींमुळे भाविकांच्या श्रद्धेला विशेष अधिष्ठान लाभले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. अष्टमीच्या दिवशी होणाऱ्या होमामुळे उत्सवाची सांगता भक्तिमय वातावरणात होते.
सुपेकर कुटुंबीयांकडे पूजेची जबाबदारी
श्री जगदंबा देऊळ तील पूजा-अर्चेची जबाबदारी सुपेकर जसे मंदिर स्थापन झाल्यापासून सर्वस्व या कुटुंबीयांकडे परंपरेने चालत आली आहे. या देऊळ मंदिरातील पुजारी धनाजी, संताजी, तानाजी, अमर, अमित, विश्वजित, प्रथमेश, आर्यन, गणेश आणि स्वप्निल सुपेकर हे पुजारी म्हणून सेवा बजावत आहेत. अनेक वर्षांपासून श्रद्धा, निष्ठा आणि सेवाभावाने जपली गेलेली ही परंपरा मंदिराच्या धार्मिक वैभवात भर घालणारी आहे. तीन शतकांचा ऐतिहासिक वारसा, 51 वर्षांची अखंड घटपरंपरा आणि नवरात्रोत्सवातील धार्मिक विधी यांमुळे भूमचे भाविकांच्या श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. आधुनिक काळातही जुन्या परंपरांचे जतन करत नवरात्र महोत्सव साजरा करणारे हे मंदिर भूमच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक ठरत आहे.
परंपरेनुसार 50 वर्षांपासून एकाच कुंभाराकडून घट आणण्यात येतो. सकाळी घटस्थापना झाल्यानंतर देवीची महाआरती करीत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. देवीच्या मंदिरापासून शहरात एकता दौड करण्यात येते. तसेच, आराधी गाणी, होमाची महापूजा व शेवट सीमोल्लंघनाने होतो. पौर्णिमेला देवीची छबिना , पोत खेळणे, पालखी मिरवणूक, गाणे म्हणणे असे निघते व कार्यक्रमाची सांगता होते.
- संतोष सुपेकर, पुजारी

