धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेला शारदीय नवरात्र महोत्सव,तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी होणारी भाविकांची मोठी गर्दी तसेच दुष्काळी परिस्थिती आणि विविध मागण्यांसाठी संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात 15 ऑक्टोबर रोजी रात्री 1.10 वाजेपासून ते 28 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) जमावबंदी व शस्त्रबंदीचे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक, धाराशिव यांनी जिल्ह्यातील विविध कार्यक्रम,सण-उत्सव आणि संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला होता.या अहवालाचा विचार करून अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यात 11 ते 27 ऑक्टोबर 2026 या कालावधीत नवरात्र महोत्सव साजरा होत आहे.या काळात विविध ठिकाणी सार्वजनिक देवींची स्थापना करण्यात येते.तसेच जिल्ह्यातील सर्व देवी मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक उत्सव साजरे केले जातात.विशेषतः महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्हे आणि विविध राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत.या उत्सवकाळात महिला व पुरुष भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे.
विशेषतः 15 ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र महोत्सवातील पाचवी माळ असल्याने तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आसपासच्या गावांसह शेजारील जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता आहे.त्यामुळे मंदिर परिसरासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची गर्दी होणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान,जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळावे,पीकविम्याची रक्कम देण्यात यावी तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी,अशा विविध मागण्यांसाठी संघटना आणि राजकीय पक्षांकडून शासकीय कार्यालयांसमोर धरणे, आंदोलने,उपोषणे,मोर्चे तसेच आत्मदहनासारखे आंदोलनात्मक प्रकार होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.
याशिवाय जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात विविध समाजघटक,संघटना आणि राजकीय पक्षांकडून आंदोलने होण्याची शक्यता आहे.विविध मागण्यांच्या अनुषंगाने शासकीय कार्यालयांसमोर किंवा जिल्ह्यातील अन्य ठिकाणी अचानक धरणे, मोर्चे,आंदोलने,उपोषणे, आत्मदहन,बंद,निदर्शने,ठिय्या आंदोलने तसेच रास्ता रोको यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यात सार्वजनिक शांतता, सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस जिल्ह्यात शस्त्रे,सोटे,काठ्या, तलवारी,बंदुका तसेच शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरू शकतील अशा सहज हाताळता येणाऱ्या वस्तू जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगता येणार नाहीत.दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे,फोडण्याची अथवा फेकण्याची उपकरणे,साधने किंवा गोळे जमा करून ठेवणे,जवळ बाळगणे अथवा तयार करणे यालाही प्रतिबंध करण्यात आला आहे.
सार्वजनिक शांतता भंग होईल अशी प्रक्षोभक किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे,आक्षेपार्ह अंगविक्षेप करणे,विडंबनात्मक नकला करणे तसेच सभ्यता आणि नीतिमत्तेला बाधा पोहोचेल किंवा राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, अराजकता माजेल अशी चित्रे, निशाण्या,घोषणाफलक अथवा अन्य वस्तू जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे देशाच्या संविधानातील मूल्यांच्या विरोधात असलेल्या किंवा देशाचा मान,सार्वभौमत्व, सार्वजनिक सुरक्षितता आणि सामाजिक सलोख्याला हानी पोहोचविणाऱ्या घोषणा देणे,गाणी म्हणणे,वाद्य वाजविणे अथवा कोणतीही कृती करण्यास प्रतिबंध राहणार आहे.सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे करणे आणि असभ्य वर्तन करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
या आदेशानुसार व्यक्ती,मृत व्यक्ती, प्रेते,आकृती किंवा त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करण्यासही मनाई राहणार आहे.तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावाला सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही.कोणतीही मिरवणूक किंवा मोर्चा विनापरवानगी काढता येणार नाही. मात्र,या प्रतिबंधात्मक आदेशातून काही आवश्यक कार्यक्रम आणि उपक्रमांना सूट देण्यात आली आहे.त्यामध्ये अंत्ययात्रा,धार्मिक विधी,लग्नसमारंभ,सामाजिक सण,शासकीय कार्यक्रम तसेच शासकीय सेवेत कर्तव्यावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
याशिवाय सार्वजनिक करमणुकीसाठी असलेली सिनेमागृहे,रंगमंच आदींनाही या आदेशातून सूट देण्यात आली आहे.प्रतिबंधात्मक आदेश लागू असलेल्या कालावधीत कोणत्याही संघटना,राजकीय पक्ष किंवा व्यक्तींना मोर्चे, मिरवणुका,सभा तसेच निवडणूक प्रचार सभांचे आयोजन करावयाचे असल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांची पूर्वलेखी परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.अशी लेखी परवानगी प्राप्त झाल्यानंतरच संबंधित कार्यक्रमास या प्रतिबंधात्मक आदेशातून सूट मिळणार आहे. नवरात्र महोत्सवाच्या काळात भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शन घेता यावे,धार्मिक उत्सव शांततेत पार पडावेत आणि जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी,या उद्देशाने हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात 15 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 1.10 वाजेपासून ते 28 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.