येरमाळा (बालाजी बारकूल)-  येरमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात पंचरात्रीनिमित्त गुरुवारी (दि. 15) देवीच्या तांदळ्यावर मोराची आकर्षक महापूजा मांडण्यात आली. या पूजेमुळे देवीचे मनमोहक रूप भाविकांना अनुभवता आले. पंचरात्रीच्या पर्वावर शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. विशेषतः महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. दर्शनासाठी रांगेत उभे राहिल्यानंतर सभामंडप व पायऱ्यांवरून पुढे जात प्रत्यक्ष देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत होती. तरीही भाविकांचा उत्साह कायम होता.

श्री येडेश्वरी देवीच्या घटस्थापनेने रविवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. नवरात्राच्या दुसऱ्या दिवसापासून देवीच्या डोंगराला खेटे घालण्याची परंपरा आहे. या धार्मिक परंपरेचे पालन करण्यासाठी येरमाळा परिसरासह राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. स्थानिक भाविकांना दररोज एक खेटा, तर बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना एकाच दिवशी पाच खेटे घालण्याची मुभा असल्याची धार्मिक परंपरा आहे. पंचरात्रीच्या निमित्ताने खेटे मार्गावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.


महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक दाखल

श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, वैराग, माढा, कुर्डुवाडी यांसह लातूर, मुरूड, धाराशिव, बीड, चौसाळा, पाटोदा, केज, धारूर, भूम, वाशी, कळंब आणि परंडा परिसरातून भाविक आले होते. तसेच मुंबई, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथूनही भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली. तुळजापूर येथे पायी जाऊन दर्शन घेतल्यानंतर श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी होती.


महिला शक्तीच्या जागराला धार्मिक महत्त्व

नवरात्र महोत्सव हा महिला शक्तीच्या जागराचा उत्सव मानला जातो. त्यामुळे या काळात देवीची आराधना करणाऱ्या महिला भाविकांसाठी पंचरात्रीला विशेष महत्त्व आहे. अनेक महिला भाविक विविध धार्मिक विधी आणि उपासना करून देवीचे दर्शन घेत आहेत. काही महिला भाविक तुळजापूर येथे पायी जाऊन देवीचे दर्शन घेतल्यानंतर येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी पायी येतात. श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम या निमित्ताने पाहायला मिळत आहे.


खेटे मार्गासह मंदिर परिसर फुलला

पंचरात्रीनिमित्त खेटे घालण्यासाठी आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण खेटे मार्ग गर्दीने फुलून गेला होता. मंदिर परिसरात ठिकठिकाणी भाविकांची वर्दळ दिसून येत होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे परिसरातील प्रसादाची दुकाने, पूजासाहित्य विक्रेते तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानांमध्येही खरेदीसाठी गर्दी झाली होती. नवरात्र महोत्सवातील पंचरात्रीच्या पर्वामुळे येरमाळा परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, देवीच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.


 
Top