धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक शांततेचा संदेश घेऊन केरळमधील तीन बायकर्स ‘राइड फॉर पीस' या मोहिमेअंतर्गत पंजाबमधील कादियानच्या दिशेने रवाना झाले आहेत. मंगळवार, दि. 14 ऑक्टोबर रोजी धाराशिव शहराच्या प्रवेशद्वारावर अहमदिया मुस्लिम जमाअतच्या सदस्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. शहरात रात्री मुक्काम केल्यानंतर दि. 15 ऑक्टोबर रोजी त्यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली.
‘प्रेम सर्वांसाठी, द्वेष कोणाशीही नाही' आणि ‘3' हा या मोहिमेचा मुख्य संदेश आहे. युद्धाऐवजी शांतता, संघर्षाऐवजी संवाद आणि द्वेषाऐवजी परस्पर सद्भावना यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचा या बायकर्सचा प्रयत्न आहे. प्रवासादरम्यान देशातील विविध भागांतून मार्गक्रमण करत ते नागरिकांशी संवाद साधणार असून, जागतिक शांततेबाबत जनजागृती करणार आहेत. या प्रवासाचे अंतिम ठिकाण पंजाबमधील कादियान असून, तेथे अहमदिया मुस्लिम जमाअतचा तीन दिवसीय राष्ट्रीय इज्तिमा आयोजित होणार आहे. या निमित्ताने शांतता आणि मानवतेचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. धाराशिवमध्ये झालेल्या स्वागतानंतर स्थानिक सदस्यांनी बायकर्सना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. सीमांच्या पलीकडे माणुसकीचे नाते जपण्याचा आणि युद्धाच्या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
विशेष म्हणजे, सप्टेंबर 2024 मध्येही केरळमधील सायकलस्वार ‘राइड फॉर पीस' मोहिमेदरम्यान धाराशिवमध्ये आले होते. त्यावेळी शहरात सायकल रॅली काढण्यात आली होती आणि विविध ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले होते. यंदा सायकलींऐवजी बाइकच्या माध्यमातून सुरू असलेला हा प्रवास शांततेचा संदेश पुढे नेणारा ठरत आहे. या कार्यक्रमात केरळमधील बाईकस्वार रहीम अहमद, निसार अहमद आणि रोशन अहमद यांच्यासह अहमदिया मुस्लिम जमाअतीचे अध्यक्ष अब्दुस समद, मजलिस अन्सारुल्लाहचे अध्यक्ष अब्दुल लतीफ, खुद्दाम-उल-अहमदिया जिल्हाध्यक्ष रागिब अलीम, खुद्दाम शहराध्यक्ष नदीम अहमद, तारिक अहमद, प्रचारक मकबूल अहमद,अब्दुल अलीम, अब्दुल नईम, अब्दुल कय्यूम नासिर, मुताहिर, सजील, तौसीफ, माजीन, शफीक, मंजूम आदी सदस्यांचा समावेश होता.
