धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर 2026 रोजी साजऱ्या करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला नवी दिशा देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रम सिंह माने यांच्या अभिनव संकल्पनेतून ‘ रीडिंग रिफ्लेक्शन ' या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, ॲकॅडमिक डीन डॉ. डी. डी. दाते, कार्यक्रमाच्या संयोजक प्रा. सुनीता गुंजाळ, बेसिक सायन्स अँड हुमानिटीच्या विभागप्रमुख डॉ. उषा वडणे,प्रा. वर्षा बोंदर,प्रा. मनीषा वाकुरे, प्रा. वर्षा पाटील, प्रा. मयुरी तांबे, सहाय्यक ग्रंथपाल विभीषण सिरसट, सविता नलावडे, सूक्ष्मा टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचनाकडे होणारे दुर्लक्ष ही चिंतेची बाब बनली आहे. वाचन हे केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नसून विचारशक्ती, कल्पनाशक्ती, आकलनक्षमता, अभिव्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा भक्कम पाया आहे. हीच जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, त्यांना विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यामध्ये वाचनाची सातत्यपूर्ण सवय रुजावी, या उद्देशाने ‘ रीडिंग रिफ्लेक्शन ' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या पुस्तकांविषयी वाचन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. गुगल फॉर्मच्या माध्यमातून पुस्तकांशी संबंधित प्रश्न विचारले जातील. विद्यार्थ्यांनी ठराविक कालावधीत या प्रश्नांची उत्तरे देऊन ती निर्धारित पद्धतीने सादर करायची आहेत. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांतील पुस्तके वाचण्याची, त्यातील विचार समजून घेण्याची आणि स्वतःचे चिंतन व आकलन व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार आहे. दर महिन्याला गुगल फॉर्मद्वारे नवीन प्रश्न आणि पुस्तकांशी संबंधित माहिती विद्यार्थ्यांसमोर ठेवली जाईल. या उपक्रमात सातत्याने सहभागी होऊन अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, निरोगी स्पर्धेची भावना आणि ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा वाढीस लागेल.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. विक्रम सिंह माने यांनी पुस्तकांचे महत्त्व विशद केले. पुस्तकांमुळे माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, विचारांना दिशा मिळते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समृद्ध होतो, असे त्यांनी सांगितले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देत त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय अंगीकारण्याचे आवाहन केले. अकॅडमीक डीन डॉ. डी डी दाते यांनी यावेळी बोलताना सांगितले की मिसाइल मॅन म्हणून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे भारताला खूप मोठे योगदान आहे.
विभागप्रमुख डॉ. उषा वडणे यांनीही वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या संयोजक प्रा. सुनीता गुंजाळ यांनी व्यक्तिमत्त्व विकासामध्ये वाचनाची भूमिका स्पष्ट केली. वाचनामुळे केवळ माहिती मिळत नाही, तर माणसाची विचार करण्याची पद्धत, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास यांनाही बळ मिळते, असे त्यांनी नमूद केले. या उपक्रमांतर्गत पहिल्या गुगल फॉर्ममधील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी 16 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निर्धारित ठिकाणी सादर करावयाची आहेत.
‘रीडिंग रिफ्लेक्शन' हा उपक्रम म्हणजे केवळ प्रश्नांची उत्तरे देण्याची स्पर्धा नसून विद्यार्थ्यांना पुस्तकांशी जोडणारा, त्यांच्या विचारविश्वाला समृद्ध करणारा आणि वाचन संस्कृती रुजविणारा एक विधायक प्रयत्न आहे. तंत्रज्ञानाच्या युगातही पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय कर्मचारी संभाजी धतुरे, सुनिता कुंभार आणि अजमेर मुलानी यांनी प्रयत्न केले. यावेळी प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
