धाराशिव (प्रतिनिधी)- निवडणूक आयोगाच्या कारभारातील कथित अनियमितता, मतदार यादीतील फेरफार आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करत काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी कळंब येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तहसील कार्यालय परिसरात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर आणि कळंब तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब शेळके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराविरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

सध्या धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या  तमजुरांच्याही हाताला काम मिळणे कठीण झाले असून त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक पावले उचलावीत. बाधित शेतकरी, शेतमजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना त्वरित आर्थिक मदत द्यावी. तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नियमानुसार सरसकट नुकसानभरपाई द्यावी आणि दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन मतदार यादीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करावी, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखावी आणि मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी निवडणूक यंत्रणेने निष्पक्षपणे काम करणे आवश्यक असल्याची भूमिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर काँग्रेसच्या वतीने मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांची चौकशी करण्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करून संकटात सापडलेल्या शेतकरी व शेतमजुरांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पांडुरंग कुंभार, दादासाहेब मुंडे, राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, प्रा. खलील सर, धनंजय राऊत, अग्निवेश शिंदे, दौलतराव माने, बाळासाहेब गपाट, अनंतराव घोगरे, ज्योती सपाटे, पाशाभाई पठाण, पृथ्वीराज देशमुख, भूषण देशमुख, शशिकांत निरफळ, शफीउल्ला पठाण, विशाल शितोळे, सचिन गायकवाड, दिलीप वाघमारे, सुभाष वाघमारे, वसंत मडके, अशोक भातलवंडे, विलास करंजकर, शंकर करंजकर, प्रभाकर जाधव, विश्वंभर मैंदाड, वैभव काळे, राजेंद्र पाटील, राजेंद्र गिरी, बाबासाहेब शेळके, प्रताप पाटील, अजित शेळके, हरिदास शिंदे, अभिषेक बागल, राजेंद्र राऊत, महावीर चव्हाण, बिलाल काझी, सरफराज काझी, हरी कुंभार, मनोज शितोळे, सुदर्शन माने, रोहित कसबे, नारायण दशवंत, शिलानंद शिनगारे, अजिनाथ मोरे, रोहित करंजकर आणि इरफान पठाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top