तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शन व्यवस्था सुलभ करण्यासाठी मंदिर संस्थानने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमामुळे आदर्श आचारसंहिता लागू असल्याने दि. 10 ते 27 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सर्व रेफरल देणगी दर्शन पास बंद राहणार आहेत.
मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी दि. 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रगटनातून ही माहिती दिली आहे. त्यानुसार, 300 रुपयांचा सशुल्क देणगी दर्शन पास घाटशीळ पार्किंग येथे, तर 1,000 रुपयांचा सशुल्क देणगी दर्शन पास प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यातून वितरित करण्यात येणार आहे. भाविकांनी या व्यवस्थेची नोंद घेऊन दर्शनासाठी नियोजन करावे, असे आवाहन मंदिर संस्थानकडून करण्यात आले आहे.