धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अंतर्गत सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुखांची विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मागील आठवड्यातील कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच विविध योजना, उपक्रम, प्रलंबित कामे, नागरिकाभिमुख उपक्रम आणि आगामी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
‘सेवा संकल्प अभियान'च्या अंमलबजावणीचा आढावा
जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान' अंतर्गत सर्व तालुक्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. अभियानांतर्गत झालेल्या उपक्रमांची माहिती, छायाचित्रे व चित्रफिती नियमितपणे प्राप्त होत आहेत का, याबाबतही पाहणी करण्यात आली. प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोकाभिमुख योजना, उपक्रम व विशेष कामांची माहिती, छायाचित्रे व चित्रफिती नियमितपणे माहिती व प्रसिद्धी कक्षाकडे उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.
‘सात ते नऊ मोबाईल-टीव्ही बंद, अभ्यास सुरू' उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याच्या सूचना
‘सात ते नऊ मोबाईल-टीव्ही बंद, अभ्यास सुरू' या उपक्रमासाठी अद्ययावत गावनिहाय नोडल अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. त्यांना उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. गटविकास अधिकाऱ्यांनी नोडल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच गावागावांत या उपक्रमाचा विस्तार करावा. यासाठी कीर्तन, भजन, स्थानिक जनजागृतीचे विविध उपक्रम आणि उपलब्ध प्रभावी माध्यमांचा वापर करून जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी नियोजन
जिल्ह्यातील संभाव्य टंचाई परिस्थितीचा विचार करून पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. आवश्यकतेनुसार तात्पुरत्या पाईपलाईन, गाळ काढणे, जलस्रोतांची उपलब्धता वाढविणे तसेच इतर पाणीपुरवठा उपाययोजनांचे नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
केवळ बोअरवेलवर अवलंबून न राहता स्थानिक परिस्थितीनुसार पर्यायी जलस्रोत व व्यवहार्य उपाययोजनांचा समावेश टंचाई आराखड्यात करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मालमत्तांची नोंद व मालकी हक्क तपासणी
जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, जिल्हा परिषद शाळा, पशुवैद्यकीय दवाखाने, अंगणवाड्या, गावठाण जमिनी तसेच इतर मालमत्तांची माहिती संकलित करून त्यांची नोंद जिल्हा परिषदेच्या नावावर आहे का, याची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
फॉर्म क्र. 8 तसेच संबंधित महसुली व मालमत्ता अभिलेखांची पडताळणी करून जिल्हा परिषदेच्या नावावर असलेल्या मालमत्ता, इतर व्यक्ती किंवा संस्थांच्या नावावर असलेल्या मालमत्ता आणि अतिक्रमण झालेल्या मालमत्ता यांची स्वतंत्र नोंद ठेवावी. आवश्यक त्या कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाहीद्वारे संबंधित मालमत्ता जिल्हा परिषदेच्या नावावर आणण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.
ग्रामसभा, कर वसुली आणि 15 वा वित्त आयोग निधी
शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत जास्तीत जास्त ग्रामसभा घेण्यात याव्यात. ज्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा झालेल्या नाहीत, तेथे तातडीने ग्रामसभा घेऊन इतिवृत्त अद्ययावत करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
पाणीपट्टी व घरपट्टी वसुली, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील महसूल वसुली तसेच संबंधित माहिती ई-मेल व व्हॉट्सॲपद्वारे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. 15 वा वित्त आयोग निधी उपलब्ध असूनही अनावश्यक शिल्लक ठेवू नये आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निधीचा प्रभावी वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले.
आपले सरकार सेवा केंद्रांबाबत कडक सूचना
आपले सरकार सेवा केंद्र चालकांना देय असलेले मानधन वेळेत अदा करावे. सेवा केंद्रामध्ये नियमितपणे काम न करणाऱ्या ऑपरेटरविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करावी तसेच आवश्यकतेनुसार त्यांचे आयडी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
‘एक दिवस एक ग्रामपंचायत तपासणी' व अभिलेख अद्ययावत करण्यावर भर
‘एक दिवस एक ग्रामपंचायत तपासणी' या उपक्रमांतर्गत ग्रामविकास अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा घेऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात यावे. यादी क्रमांक 1 ते 33 नुसार संबंधित अभिलेख अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले. विभागप्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांनी अभिलेखांची क्रॉस-व्हेरिफिकेशन करावी. अभिलेख अद्ययावत न करणाऱ्या संबंधितांविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
‘चला शाळेत जाऊया' उपक्रमाचा आढावा
‘चला शाळेत जाऊया' उपक्रमांतर्गत शाळांमधील किरकोळ दुरुस्ती, स्वच्छता, पाणीपुरवठा व नळ जोडण्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायतींनी नियमांच्या अधीन राहून उपलब्ध निधीतून आवश्यक कामे पूर्ण करावीत. ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत शाळांची स्वच्छता आठवड्यातून किमान तीन दिवस करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
आवास प्लस व मनरेगा कामांना गती
आवास प्लस योजनेचा गावनिहाय आढावा घेण्यात आला. पात्र व अपात्र लाभार्थ्यांबाबत ग्रामसभेचे ठराव घेऊन आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. प्रलंबित मस्टरची कामे पूर्ण करण्यासाठी तालुकास्तरावर पथके तयार करून कार्यवाही करावी.
मनरेगा अंतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. टंचाईच्या पार्श्वभूमीवर रोजगारनिर्मिती व जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यास कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले.
आरोग्य विभागाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा
संसर्गजन्य आजारांचे सर्वेक्षण, पाणी साठ्यांची तपासणी, नदी-नाले व सांडपाणी व्यवस्थापन तसेच मलेरिया व इतर कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
संभाव्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत राबवाव्यात. आवश्यकतेनुसार फॉगिंग मशीनची उपलब्धता तपासून खरेदीची कार्यवाही करावी तसेच ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.
अर्थ व वित्त विभाग : विभागनिहाय प्रलंबित लेखाक्षेपांच्या अनुपालनाबाबत सूचना
अर्थ व वित्त विभागाच्या आढाव्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या लेखाक्षेप व ऑडिट मुद्द्यांच्या अनुपालनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी प्रलंबित लेखाक्षेपांचे आवश्यक अनुपालन करून जास्तीत जास्त प्रलंबित मुद्दे निकाली काढून वगळून घेण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व खातेप्रमुख तसेच पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांनी प्रलंबित लेखाक्षेपांच्या अनुपालनाबाबत आवश्यक कागदपत्रांसह शिफारस पत्र सादर करावे, असे निर्देश देण्यात आले. प्रलंबित मुद्द्यांचे अनुपालन जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार ऑडिट कॅम्प आयोजित करून अधिकाधिक मुद्दे निकाली काढण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.
न्यायालयीन प्रकरणांचा साप्ताहिक आढावा
जिल्हा परिषद अंतर्गत प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा नियमित व साप्ताहिक आढावा घेऊन त्यातील प्रकरणांच्या निकालासाठी आवश्यक कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थी हिताला प्राधान्य
सद्यस्थितीतील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी निःशुल्क करण्याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करावी. विद्यार्थ्यांना शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक लाभ मिळेल, याची शिक्षण विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
योजनांची व लोकाभिमुख कामांची प्रभावी प्रसिद्धी
जिल्हा परिषद अंतर्गत प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोकाभिमुख योजना, उपक्रम, विशेष कामगिरी, यशोगाथा व महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती नियमितपणे माहिती व प्रसिद्धी कक्षास उपलब्ध करून द्यावी. कामांची छायाचित्रे, चित्रफिती व आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून देऊन जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रमांची व्यापक जनजागृती करण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
दर सोमवारी विभागनिहाय साप्ताहिक आढावा
प्रत्येक सोमवारी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागांची विभागनिहाय व खातेनिहाय साप्ताहिक आढावा बैठक घेण्यात येणार असून, मागील आठवड्यातील कामांची प्रगती, प्रलंबित कामे, योजना व उपक्रमांची अंमलबजावणी, निश्चित उद्दिष्टे आणि पुढील आठवड्याचे नियोजन याबाबत आढावा घेतला जाणार आहे. सर्व विभागप्रमुखांनी अद्ययावत माहिती व अहवालांसह बैठकीस उपस्थित राहावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर यांनी दिले.
प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडील प्रलंबित कामांना गती देऊन निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत. अनावश्यक विलंब अथवा कामात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर यांनी दिला. बैठकीस जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुख तसेच पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तालुकास्तरावरही या सर्व सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
