धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामीण भागातील विविध समस्यांबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी चर्चा करून विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी दुष्काळामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई, पिकांची परिस्थिती, पशुधनासाठी चारा व पाण्याची उपलब्धता तसेच शेतकऱ्यांना आवश्यक मदत व तातडीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अर्थ व बांधकाम सभापती सिद्धेश्वर कोरे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
यावेळी जळकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आशिष सोनटक्के, तुळजापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, बंजारा समितीचे अध्यक्ष विलास राठोड, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दत्ताभाऊ राजमाने, हंगरगा (नळ) येथील प्रवीण चौगुले, शरद भोसले, अतुल भोसले, सुरेश वागदरे, माने तसेच माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत मा. अध्यक्षा अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक त्या उपाययोजना व मदत मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळावा आणि आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, यासाठी पुढील कार्यवाही करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
