तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या प्रचाराला धाराशिव जिल्ह्यात गती देण्यात येत आहे. याच अनुषंगाने डॉ. शिल्पा प्रतापसिंह पाटील यांनी अणदूर आणि तुळजापूर परिसरातील ज्येष्ठ राजकीय नेते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक आणि वकील बांधवांच्या भेटी घेऊन पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर संवाद साधला आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदार सतिश चव्हाण धाराशिव जिल्ह्यातील रहिवाशी असतानाही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला कधी हजर होते. या संदर्भातही पदवीधर मतदार प्रश्न विचारात आहेत.
अणदूर येथे महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांच्या निवासस्थानी डॉ. शिल्पा पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पदवीधरांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. अणदूर येथील जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी आणि प्राध्यापकवृंदाशी संवाद साधण्यात आला. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख संधी उपलब्ध करून देणे याबाबत चर्चा करण्यात आली. तुळजापूर येथे उल्हास बोरगावकर यांच्या निवासस्थानी काही प्राध्यापकांची गाठीभेटी घेवून चर्चा करण्यात आली.
तसेच तुळजापूर न्यायालयातील वकील बांधवांशी संवाद साधून त्यांच्या विविध प्रश्नांची माहिती घेण्यात आली. अणदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामदादा आलुरे यांचीही सदिच्छा भेट घेण्यात आली. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, महेश कदम, शरद जगदाळे, अमोल पाटील, अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश तांबारे, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रवी ठेंगल, लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश जाधव, इंजिनिअरिंग सेलचे जिल्हाध्यक्ष सूरज वडवले, अजिंक्य हिबारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
