धाराशिव (प्रतिनिधी)- प्रत्येक मुला-मुलीला शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या बाबतीत समान संधी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. या हक्कांचे संरक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः बौद्धिकदृष्ट्या अक्षम आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांच्या अधिकारांविषयी जनजागृती होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद, जिल्हा शासकीय रुग्णालय, धाराशिव आणि स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह व शाळा,आळणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्यायाधीश अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे उपमुख्य न्यायरक्षक ॲड.अभय पाथरूडकर यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने मुलींच्या विविध आरोग्य तपासण्या केल्या.यामध्ये वरिष्ठ निवासी मानसोपचारतज्ज्ञ डॉ.आशिष झरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश कानडे,स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अश्विनी दहिटकर,बालरोगतज्ज्ञ डॉ.सुधाकर तलारी आणि त्वचारोगतज्ज्ञ विशाल इंदुरीकर यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह,आळणीचे सचिव शहाजी चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका अन्नपूर्णा लठ्ठे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शिक्षिका निकिता माने यांनी मानले.