तुळजापूर (प्रतिनिधी)- मुलगी म्हणजे चूल आणि मूल' या पारंपरिक मानसिकतेतून बाहेर पडत तुळजापूरच्या लेकीने थेट दिल्लीवर आपली मोहोर उमटवली आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी प्रवीण अपराध यांच्या कन्या कादंबरी प्रवीण अपराध हिची AIIMS CAPFIMS, दिल्ली येथे वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली आहे. बालपणापासून पाहिलेले डॉक्टर होण्याचे आणि देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थेत शिक्षण घेण्याचे स्वप्न कादंबरीने आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर अखेर पूर्ण केले आहे.
कादंबरीच्या या यशामुळे केवळ अपराध कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. तुळजापूरमधून मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थिनी म्हणून कादंबरीचे हे यश विशेष मानले जात आहे.
‘संधी मिळाली तर तुळजापूरच्या लेकी दिल्लीही गाजवू शकतात!'
तुळजापूरमधील मुलीं चुल विषयी असलेल्या जुन्या चौकटीच्या मानसिकतेला कादंबरीच्या यशाने जणू सडेतोड उत्तर दिले आहे. मुलींना योग्य संधी, शिक्षण आणि प्रोत्साहन मिळाले तर त्या कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊ शकतात, हे कादंबरीने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात देशातील सर्वोच्च संस्थांपैकी एक असलेल्या AIIMSमध्ये प्रवेश मिळविणे ही मोठी कामगिरी मानली जाते. कादंबरीने लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्यासाठी तिने सातत्याने अभ्यास करत कठोर परिश्रम घेतले. अनेक अडचणींवर मात करत तिने आपले ध्येय गाठले आणि आता तिच्या या यशाकडे तुळजापूरमधील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.
अपराध कुटुंबाची वैद्यकीय क्षेत्रातील परंपरा पुढे
कादंबरीच्या यशामागे तिच्या कुटुंबातील शैक्षणिक वातावरणाचाही मोठा वाटा आहे. तिचे वडील प्रवीण अपराध हे श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी असून सध्या न्यायालयात स्टेनोग्राफर म्हणून कार्यरत आहेत. तिची आई गृहिणी आहे.
अपराध कुटुंबातील वैद्यकीय क्षेत्रात जाणारी कादंबरी ही तिसरी डॉक्टर ठरणार आहे. तिचा भाऊ आदित्य अपराध सध्या जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तसेच तिचा चुलत भाऊ डॉ. संग्राम प्रशांत अपराध याने एमडी पदवी संपादन केली आहे. त्यामुळे कादंबरीच्या AIIMS मधील निवडीने अपराध कुटुंबाच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय वाटचालीत आणखी एक मानाचा अध्याय जोडला आहे.
तुळजापूरच्या शैक्षणिक वाटचालीतील मानाचा तुरा
तुळजापूरची ओळख आजवर धार्मिक आणि पर्यटन क्षेत्रामुळे देशभरात होती. मात्र, आता तुळजापूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तेचीही चर्चा दिल्लीपर्यंत पोहोचत आहे. कादंबरी अपराध हिची AIIMS मध्ये झालेली निवड ही तुळजापूरच्या शैक्षणिक वाटचालीतील मानाचा तुरा मानला जात आहे.
कादंबरीचे हे यश तुळजापूरमधील इतर विद्यार्थिनींसाठीही आत्मविश्वास वाढविणारे ठरणार आहे. ‘आपणही मोठे स्वप्न पाहू शकतो आणि ते पूर्ण करू शकतो,' असा संदेश तिच्या यशातून मुलींना मिळाला आहे.
तुळजापूरला भविष्यात शैक्षणिकदृष्ट्या सक्षम ‘एज्युकेशन हब' म्हणून विकसित होण्याची क्षमता असल्याचेही कादंबरीसारख्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशातून अधोरेखित होत आहे. धार्मिक नगरी म्हणून देशभर परिचित असलेल्या तुळजापूरच्या शिरपेचात आता AIIMS ची मोहोर उमटली आहे.
कादंबरीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, भावी डॉक्टर म्हणून तिची वाटचाल अधिक उज्ज्वल होवो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
