वाशी (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व क्रांतीसूर्य आण्णासाहेब पाटील महाविद्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धाराशिव जिल्हा आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धा दि. 3 ऑक्टोबर 2026 रोजी श्री. तुळजाभवानी स्टेडियम, धाराशिव येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशीच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत कोरडे रामेश्वर यांनी 5 किलोमीटर धावणे प्रकारात तृतीय क्रमांक, फुलारे महादेव यांनी 400 मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक, सारूख अर्जुन यांनी 400 मीटरमध्ये तृतीय क्रमांक, सावंत अशोक यांनी लांब उडीत तृतीय क्रमांक, कैफ मुजावर यांनी गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक, थोरबोले उमेश यांनी थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक, तर लाखे अनिता यांनी 800 मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच गाडे निखिल (10 किलोमीटर), गाडे शुभम (5 किलोमीटर), नवले चैत्यन्य (800 मीटर), कांबळे सिद्धार्थ (4400 मीटर रिले), शिंदे आरती (200 मीटर), थोरबोले रेणुका (400 मीटर), ढाकणे भाग्यश्री (400 मीटर व गोळाफेक), जाधवर सुहास (100 मीटर), माने प्रतीक (1500 मीटर) आणि दराडे प्रथमेश (गोळाफेक) यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत प्रोत्साहनार्थ यश संपादन केले.
या सर्व यशस्वी क्रीडापटूंचा तसेच क्रीडा मार्गदर्शक प्रा. डॉ. रवी चव्हाण यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही सातत्याने प्रगती करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास प्रा. डॉ. बालाजी देवकते, प्रा. डॉ. कुंडलिक गुंड, प्रा. शामसुंदर डोके यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. महादेव उंदरे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. रवी चव्हाण यांनी मानले.
